मनाली देवरे, नाशिक
…..
शुक्रवारी अबुधाबीत झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ८ गडी राखून जबरदस्त पराभव केला. या विजयामुळे, एकीकडे पहिल्या २ क्रमांकावर राहण्याची मुंबई इंडियन्स संघाची मोहीम आणखी फत्ते झाली आहे. परंतु दुसरीकडे या पराभवाने कोलकाता नाइट रायडर्सला मात्र पहिल्या ४ संघात स्थान पक्के करण्यासाठी आता आणखी कष्ट करावे लागणार आहेत. कोलकात्याच्या १४८ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा विकेट किपर बॅट्समन क्विंटन डीकॉकने ४४ चेंडूत ७८ धावा केल्या तर सलामीच्या रोहित शर्माने ३५ धावांचे योगदान देऊन संघासाठी हा विजय आणखी सोपा केला.
केकेआर–कर्णधार बदलला पण ‘लक‘ नाही
शुक्रवारचा सामना सुरू होण्याआधी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने स्वतःच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचे कारण दाखवून कर्णधारपद सोडले आणि त्यामुळे इयान मॉर्गनकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. संघाचा कर्णधार बदलला, त्यामुळे कदाचित संघाचे लक सुद्धा बदलेल असे वाटत होते. मात्र तसे झालेच नाही. उलट टाॕस जिंकून फलंदाजी करण्याचा या नव्या कर्णधाराचा निर्णय संघाच्या चांगलाच अंगलट आला. १० व्या षटकात फक् ६० च्या आसपास धावा झालेल्या असतांना, कोलकात्याचे ५ फलंदाज तंबूत परतलेले होते. परंतु त्यानंतर पॕट कमिन्स आणि मॉर्गन यांनी थोड्याफार जबाबदारीने खेळ केल्यामुळे किमान १४२ धावांचे समाधानकारक आव्हान केकेआरला मुंबई समोर ठेवता आले. मुंबईच्या कुल्टर नाईलचा अपवाद वगळला तर इतर सगळ्याच गोलंदाजांनी अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली. जसप्रीत बुमरा, कुणाल पांड्या आणि राहुल चहर यांनी धावा रोखून धरताना कोलकात्याच्या फलंदाजांवर असलेला दबाव कायम ठेवला.
शनिवारचे सामने
शनिवारी डबल धमाका असतो. यंदाचा डबल धमाका थोडा वेगळा आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स चा मुकाबला राजस्थान रॉयल्स सोबत होईल तर संध्याकाळी होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स चेन्नई सुपर किंग सोबत भिडेल.