मनाली देवरे, नाशिक
…..
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने आज दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सचा ८२ धावांनी एकतर्फी पराभव केला. शारजामध्ये १९४ धावांचा पाठलाग करताना अखेर त्यांचा डाव २० षटकात ११२ धावात आटोपला. एकट्या शुभमन गिलचा अपवाद सोडला तर टॉम बेंटन, नितीश राणा, मॉर्गन, दिनेश कार्तिक, रसेल आणि राहुल त्रिपाठी यांच्यापैकी कुणालाही खेळपट्टीवर तग धरता आला नाही.
फिरकीची ‘सुंदर’ जादू
रॉयल चॅलेंजरच्या वॉशिंग्टन सुंदर आणि यजुर्वेंद्र चहल या दोन फिरकी बहाद्दरांनी अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. चहलने ४ षटकात अवघ्या १२ धावा देऊन २ बळी घेतले तर वॉशिंग्टन सुंदरने देखील ४ षटकात २९ धावा देऊन २ बळी घेतले. अगदी कसोटी क्रिकेटला देखील लाजवेल अशा गोलंदाजीची हीच आकडेवारी केकेआर साठी अखेर घातक ठरली.
एबीचा घणाघात.
त्याआधी रॉयल चॅलेंजर्स, बंगलोर संघातर्फे फलंदाजी करताना खऱ्या अर्थाने ‘रॉयल’ कामगिरी केली ती एबी डिव्हिलियर्सने. एबी कडे तंत्र आहे, जोश आहे आणि, अगदी विनोदानेच वर्णन करायचे झाले तर, समोरच्या गोलंदाजाला चेंडू सकट सीमारेषेच्या बाहेर फेकण्याइतपत त्याच्या मनगटात क्षमता आहे. या सामन्यात एबीच्या खेळीत हेच तर दिसलं. ३३ चेंडूत ७३ धावा कुटणाऱ्या एबीने ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने (स्टाईक रेट २२१.२१) धावा केल्या. त्यानंतर कोलकत्ता नाइट रायडर्सच्या सघांला १९४ धावांचा डोंगर कसा काय पार करायचा? याचा विचार करता करताच मॕच गमवावी लागली.
या मोसमात अॕराॕन फिंच आणि देवदत्त पडीकल या सलामीच्या फलंदाजांनी बेंगलोर सातत्याने धावा केल्या आहेत. आजही त्यांची पहिली विकेट ६७ धावसंख्या असतांना पडली आणि नंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या विराट कोहलीने एबीच्या मदतीने डावाला आकार दिला.
मंगळवारचा सामना
मंगळवारी होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पुन्हा एक संधी मिळते आहे. एकूण ७ सामने म्हणजे जवळपास निम्मे सामने खेळल्यानंतर चेन्नईला फक्त २ विजय मिळाले आहेत तर सनरायझर्स हैदराबादला ३ विजय. आता या सामन्यात एका विजयाची भर टाकायची संधी या दोन्हीपैकी एका संघाला नक्की मिळेल.