नाशिक – नाशिक रोड पोलिस स्टेशनमधील पोलिस नाईक अरुण हरी लहाने याला दीड हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. एका गुन्ह्याप्रकरणी कोर्टाने आरोपीला वॉरंट बजावले होते. या वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे काम नाशिक रोड पोलिसांकडे देण्यात आले. या वॉरंटची अंमलबाजवणी न करण्यासाठी अरुण लहाने याने दीड हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) तक्रार करण्यात आली. त्याची दखल घेत एसीबीने तत्काळ सापळा रचला. त्यानुसार, लहाने हा नाशिक रोड पोलिस स्टेशनमधील रुम नंबर १ मध्ये दीड हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडले गेला. याप्रकरणी एसीबीकडून लहाने विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, लाच घेणे आणि देणे गुन्हा असून याप्रकरणी तक्रार देण्यासाठी एसीबीच्या १०६४ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.