नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा प्रसार कसा झाला? मानवामध्ये तो कसा पोहोचला? याबाबत गेल्या एका वर्षांपासून संशोधन व अभ्यास सुरू आहे. यासंबंधी अधिक जाणून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमने अलीकडेच चीनमधील वुहान शहराला भेट दिली. आता तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO)च्या अभ्यासात या प्रश्नाचे उत्तर देण्यात आले आहे. कोरोना विषाणू हा चीनच्या वुहान लॅबपासून पसरलेला नाही, तर तो एका प्राण्यापासून मनुष्याकडे आल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे.
वास्तविक वुहानमधील लॅबमधून कोरोना विषाणू पसरविण्याचा चीनवर खूप दिवसांपासून आरोप होत आहे. तथापि, चीनने नेहमीच याचा इन्कार केला आहे. आता कोरोना विषाणूचे मूळ शोधण्यासाठी चीनला भेट दिलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणू चमगादड या माश्यांद्वारे आणि इतर प्राण्यांच्याद्वारे मानवांमध्ये पसरला जाण्याची शक्यता आहे. तसेच लॅबमधून व्हायरस पसरण्याची शक्यता फारच कमी आहे. तपास पथकाच्या अहवालात ही माहिती दे-ण्यात आली आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या तपास पथकाने प्रयोगशाळेतून व्हायरस होण्याच्या शक्यतेविषयी तसेच इतर सर्व बाबींवर पुढील तपासणीचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच कोरोनाच्या उत्पत्तीविषयीचा अहवाल येत्या काही दिवसांत जाहीर होईल, असे डब्लुएचओकडून सांगितले जात आहे.
या अहवालात चार तत्त्वे आणि संभाव्य निष्कर्ष आहेत. प्रत्यक्षात हा अहवाल प्रसिद्ध होण्यास सतत विलंब होत होता, ज्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. असे म्हटले जात आहे की, साथीच्या रोगाचा प्रसार करण्यासाठी चीनला दोषी ठरवले जाऊ नये, असे या पथकाला वाटते.