नवी दिल्ली – जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त लसीचा साठा बुक करण्यासाठी विकसित देश पुढे येत असल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक देश आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त लसीचा साठा संकलित करण्याच्या प्रयत्नात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारताने ६० कोटी लसीचा साठा संकलित केला आहे. आता १०० कोटी लसीच्या साठ्याच्या प्रस्ताव देण्यात आला असून लवकरच यास मंजुरी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जगभरातील लस तयार करणाऱ्या देशांमध्ये भारताची गणना केली जात आहे.
ग्लोबल ऍनालिसीसच्या मते, विकसित देशांनी ८ ऑक्टोबरपर्यंत सुमारे चार अब्ज डोस बुक केले होते. याव्यतिरिक्त, सुमारे पाच अब्ज डोससाठी बोलणी सुरू आहेत. भारतासाठी मोठी गोष्ट म्हणजे देश लस उत्पादनात सध्या अग्रेसर आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासारख्या टॉप लस उत्पादक कंपन्यांव्यतिरिक्त भारत बायोटेक आणि जायडस कैडिला या कंपन्या देखील या शर्यतीत सहभागी आहेत. अमेरिकेच्या ड्यूक ग्लोबल हेल्थ इनोव्हेशन सेंटरच्या अहवालानुसार ८ ऑक्टोबरपर्यंत कोरोना लसीच्या बुकिंगमध्ये अमेरिकेपाठोपाठ भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जगाला कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी भारत विविध प्रकारच्या लस तयार करीत आहे. हे निश्चित आहे की देशाने नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केली आहे.