मुंबई/नवी दिल्ली– भारतात कोरोनाने जवळपास दीड लाख जणांचे जीव घेतल्यानंतर आता प्रत्येकाला लसीची प्रतिक्षा लागलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीचा आणि मृत्यूचा वेग मंदावला असला तरीही भविष्यातील हे संकट टाळण्यासाठी केंद्र सरकार लसीसाठी जोरदार तयारी करीत आहे. त्यासाठी दररोज तासाला जवळपास एक लाख इंजेक्शन्स तयार होत आहेत.
भारतात आतापर्यंत ९८ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यापैकी जवळपास ९३ लाख लोक बरेही झाले आहेत. मात्र संक्रमण अद्याप थांबलेले नाही. त्यामुळे आपात्कालिन परिस्थितीत कोरोना लशीचा वापर करण्याची परवानगी घेण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. लस आल्यानंतर ती देण्यासाठी इंजेक्शनचीही गरज असेल. त्याचाच अंदाज घेत हरियाणातील फरिदाबादमध्ये हिंदुस्थान सिरिंज कंपनीच्या फॅक्ट्रीत प्रत्येक तासाला एक लाख सिरींजची निर्मिती होत आहे. याशिवाय इतर भारतीय कंपन्याही दररोज रात्रं-दिवस एक करून सिरींजची निर्मिती करीत आहे. कोरोना व्हायरसच्या लसीकरणाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एक विशेष पद्धतीटे सिरींज वापरले जाणार आहे. याच वैशिष्ट्यामुळे लॉक सिरींजचा वापर एकदाच करता येणार आहे. पहिल्याच वापरात लॉक होणार असल्याने दुसऱ्यांदा त्याचा वापर होऊ शकणार नाही. ०.५ एमएलच्या सिरींजची प्रथमच वैशिष्ट्यपूर्ण तंत्राद्वारे निर्मिती होत आहे. आतापर्यंत लाखो सिरींज तयार झालेल्या आहेत. केंद्र सरकारनेही या कंपन्यांना आतापर्यंत कोट्यवधी सिरींजचे कार्यादेश जारी केले आहेत.
फरिदाबादमधील कंपनीने पुढील वर्षापर्यंत १०० कोटी सिरींजच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) राजीव नाथ यांनी सांगितले की सिंगल यूज सिरींजचा दुसऱ्यांदा वापर करण्याचा कुणी प्रयत्न केला तरीही त्याला तो करता येणार नाही.
चार भागांमध्ये सिरींज
हे सिरिंज चार भागांमध्ये बनविले जात आहे. ज्यात एक प्लंजर आहे जे डोस देताना ओढले जाते. हे प्लंजर केवळ एकदाच ओढता येणार आहे. जेणेकरून हवेचा दाब कायम राहील. त्यानंतर प्लंजरला दाबून डोस स्नायूंमध्ये सोडला जाईल. दुसऱ्यांदा प्लंजरचा वापर करायचा प्रयत्न केला तर तो तुटून जाईल, असेही कंपनीचे एमडी म्हणाले. दुसरा भाग निडल म्हणजेच सुई असेल आणि एका खास तंत्राद्वारे ते लॉक करण्यात आले आहे.
एका व्यक्तिला दोन डोस
भारतात कोरोनाच्या लसीकरणासाठी कोट्यवधी सिरींज लागणार आहेत. त्यातल्या त्यात एका व्यक्तिला दोनवेळा ही लस द्यावी लागणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पहिल्या जोडसाठी केंद्र सरकारने ९० कोटी सिरींज लागतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. पहिला टप्पा पार करण्यासाठी सरकारला दुप्पट सिरींजची आवश्यकता असेल.