नवी दिल्ली – कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी देशात लसीकरण अभियानांतर्गत सामान्य नागरिकांना लस देण्यास प्रारंभ झाला आहे. कोणताही पात्र व्यक्ती कुठेही, कधीही लस घेण्यासाठी नोंदणी करू शकतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. कोविन या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून लसीकरण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जाणार आहे.
कोण करू शकतो अर्ज
६० वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील इतर आजार असलेले लोक अर्ज करू शकतात. ज्या केंद्रावर लसीकरण सुरू आहे, तिथं जाऊन आपली नोंदणी करू शकतात. तिथं लोकांच्या मदतीसाठी स्वयंसेवक उपलब्ध असतील.
सरकारी केंद्रावर लस मोफत
सरकारी केंद्रांवर लसीकरण मोफत केले जाणार आहे. खासगी केंद्रांसाठी सरकारनं २५० रुपये शुल्क ठरवले आहे. यामध्ये १५० रुपये लशीची किंमत असून, १०० रुपये सर्व्हिस चार्ज असतील.
नोंदणी कशी कराल
कोणतीही व्यक्ती को-विन २.० पोर्टल अथवा आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी करू शकते. एका मोबाईल नंबरवर चार लोकांचे लसीकरण होऊ शकते. परंतु सर्वांकडे ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, एनपीआर स्मार्टकार्ड किंवा पेन्शनकार्डवरून नोंदणी करू शकतात. आरोग्यसेतू अॅपद्वारेसुद्धा नोंदणी केली जाऊ शकते.
या आजारांच्या व्यक्तींना लाभ
१) वर्षभरात हृदयविकाराचा झटका आलेली व्यक्ती
२) हृदय प्रत्यारोपण किंवा लेफ्ट वेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाईल लावलेली व्यक्ती
३) लेफ्ट वेंट्रिक्युलर सिस्टोलिक डाइसफंक्शन (एलवीईएफ ४० टक्क्यांहून कमी) लावलेले
४) मध्यम अथवा गंभीर हृदयाचा आजार असलेली व्यक्ती
५) जन्मजात हृदयाचा आजार असलेली व्यक्ती
६) हृदयाची धमणी तसंच तणाव किंवा मधुमेहावर उपचार सुरू असलेली व्यक्ती
७) कंठदाह आणि अतितणाव किंवा मधुमेहावर उपचार घेत असलेली व्यक्ती
८) पक्षाघात, अतितणाव किंवा मधुमेहावरील उपचाराशी निगडित सीटी एमआरआय दस्तऐवज
९) प्लमोनरी आर्टलरी हायपर टेन्शन आणि हायपरटेन्शन किंवा मधुमेह झालेली व्यक्ती
१०) मधुमेह (१० वर्षांहून अधिक गंभीर) अतिताणतणाव असलेली व्यक्ती
११) किडनी किंवा यकृत किंवा हेमॅटोप्वाइएटिक स्टेम सेल प्रत्यारोपण
१२) किडनीची अत्यंत गंभीर परिस्थिती असलेली व्यक्ती
१३) अनेक दिवसांपासून कोटकोस्टेरॉइडची गोळी खाणारी व्यक्ती
१४) वर्षभरात श्वासाच्या गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल व्यक्ती
१५) लिफोमा, ल्टुकेमिया किंवा मायलोमाग्रस्त असलेली व्यक्ती
१६) एक जुलै २०२० किंवा त्यानंतर निदान झालेल्या कोणत्याही प्रकारचा कर्करोग झालेली व्यक्ती
१७) सिकल सेल आजार किंवा हाडांसदर्भात झालेला आजार, थॅलेसिमिया किंवा अॅप्लास्टिक अॅनिमिया झालेली व्यक्ती
१८) प्रायमरी इम्युनोडिफिशिअँन्सी डिजिस किंवा एचआयव्ही झालेली व्यक्ती
१९) इंटेलॅक्च्युअल डिसेबिलिटीज किंवा मस्कुलर डिस्ट्रॉफी किंवा अॅसिड अॅटॅकमुळे श्वसनतंत्रावर परिणा झालेली व्यक्ती.
२०) दिव्यांग व्यक्ती, त्यात अंधपणा, बहिरेपणा, असलेली व्यक्ती