नवी दिल्ली – भारतात जगातील सर्वात मोठं कोरोना लसीकरण अभियान सुरू आहे. ज्यामध्ये सर्वात प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस यशस्वीरित्या देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांसारख्या फ्रंट लाईन वॉरियर्सना लस दिली जात आहे. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षाच्या वरील नागरिकांना लस दिली जाईल. लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. कोविड-१९ लस घेणाऱ्या व्यक्तिंमध्ये जगात भारतातील मृत्यूदर सर्वात कमी आहेत, असं सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.
लस दिल्यानंतर आतापर्यंत फक्त २३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. लसीकरण होण्यापूर्वी झालेल्या मृत्यूचा दर ०.०००३ टक्के आहे. २३ पैकी ९ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर १४ जणांचा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला आहे. कोविडच्या लसीमुळे ह्या व्यक्तींचा मृत्यू झाला नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे. भारताने स्विकारलेल्या दोन्ही लशी सर्वाधिक सुरक्षित आहेत, यावर सरकारकडून भर दिला जात आहे.
६० लाख कर्मचाऱ्यांना लस
दोन्ही लशी पूर्णपणे सुरक्षित आहेत, याबाबत कोणतीच शंका नाही, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. लशीबाबतच्या प्रतिकूल प्रतिक्रिया फारच कमी आहेत. १४ पैकी १ असं जरी गृहित धरलं तरी हे आकडे खूपच कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बुधवारपर्यंत जवळपास २,००,००० लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ६०.८ लाख आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर यांचा समावेश आहे.