नवी दिल्ली – कोरोना लसीकरण लवकरच देशभरात सुरू होणार आहे. या लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत.मात्र, दोन डोसमध्ये किती दिवसांचे अंतर राहणार आहे याबाबत स्पष्टता नव्हती ती आता झाली आहे. दोन डोसमध्ये तीन महिन्यांचे अंतर असणार आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर्श पूनावाला यांनी अमेरिकेतील निकालांच्या आधारे एका निवेदनात सांगितले आहे की, आपल्या देशात दोन डोस दरम्यान दोन ते तीन महिन्यांचा अवधी ठेवल्यास त्याचा परिणाम ९० टक्क्यांपर्यंत यशस्वी होऊ शकतो. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने यावर सहमती दर्शविली असून सिरमला लेखी संमतीपत्र दिले आहे. या अंतर्गत १८ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना फक्त कोविशिल्ड लस दिली जाऊ शकते. तसेच सामान्यत: दुसरा डोस हा चौथ्या आठवड्यात दिला जाऊ शकतो, परंतु परिणाम लक्षात घेता १२ आठवड्यांच्या अंतराने दोन डोस देण्यास सिरमला मान्यता देण्यात आली आहे.
भारत बायोटेकची लस १२ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाईल. कारण यापेक्षा लहान मुलांमध्ये अद्याप या लसीची चाचणी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे लहान मुलांसाठी स्वतंत्र चाचणी घेण्यावर सरकार विचार करीत आहे.