नवी दिल्ली – कोरोना लस अद्याप तयार झाली नसली तरी देशभरात तिचे योग्य वितरण करण्यासाठी वाहतुकीचे अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. देशातील विविध विमानतळांवर कोरोना लस योग्य तापमानात ठेवण्यासाठीची उपाययोजना केली जात आहे. हवाई मार्गाने लसीची वाहतूक होणार असल्याने त्या दृष्टीने पाऊले उचलले जात आहेत.
मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सर्वाधिक औषध उत्पादने वितरीत होतात. म्हणूनच कोरोना लसीच्या वितरणासंबंधी तेथे विविध कामे सुरु आहेत. विमानतळावरील कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांना विशिष्ट वेळापत्रक दिले जाणार आहे. त्यानुसार त्यात आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. सामान चढवतांना आणि उतरवतांना एक्सरे मशीन आणि युनिट लोड डिव्हाईस सक्रीय करण्यात येणार आहे. तसेच दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर वर्षभरात १५ लाख टन सामानाची वाहतूक केली जाते. त्यात कोरोना लसीसाठी उणे २० अंश सेल्सिअस तापमान राखण्याबाबतच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
विविध हवाई मालवाहतूकदार व चालकांच्या म्हणण्यानुसार, कमी वेळात लसीचा जास्त साठा असणे, त्याचे भारतात वितरण होणे हे आव्हानात्मक असेल, म्हणून विशेष तयारी आवश्यक आहे. ब्लू डार्टमध्ये कार्गो वाहक ७५७ बोईंग ही सहा विमाने आहेत. गरज भासल्यास अन्य विमाने तैनात करण्याचीही तयारी केली जात आहे. लसीच्या विशेष गरजा लक्षात घेऊन मुंबई, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू येथे खास फार्मा-कंडिशन स्टोअर रूम स्थापित केले जात आहेत.