लंडन – कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येने भारत चिंतेत असला तरीही काही देश पुढच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. आता तर ब्रिटन सरकारने कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सवरही उपाय शोधून ठेवले आहेत. कोरोनाच्या लशीचा नागरिकांवर प्रयोग करण्यापूर्वीच साईड इफेक्ट्स झाल्यास भरपाई देण्याची घोषणा ब्रिटन सरकारने केली आहे.
फायजर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशींच्या प्रत्यक्ष वापरासाठी मंजुरी मिळाल्यानंतर ब्रिटन सरकारने भरपाईची घोषणा केली. विशेष म्हणजे नागरिकांना कोरोना लस देण्याची घोषणा करणारा ब्रिटन हा जगातील पहिला तसेच एकमेव देश आहे.
ब्रिटनमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या आटोक्यात आलेली नाही. दिवसेंदिवस प्रशासनापुढे आव्हान निर्माण करणारी परिस्थिती उद्भवत आहे. मात्र त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्नही थांबलेले नाहीत. अशात आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी ब्रिटन सरकारने देशभरात फायजर-बायोएनटेकद्वारा तयार करण्यात आलेल्या कोरोना लशीचा वापर करण्याची परवानगी दिली.
ब्रिटनच्या औषध नियंत्रण एमएचआरने म्हटले आहे की ही लस ९५ टक्के प्रभावी असून तिच्या व्यापर वापराची परवानगी मुळीच धोकादायक नाही. परंतु, प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर सर्वांत पहिले या लशीचा वापर होणार आहे. त्यासाठी चार कोटी डोझेसचा आर्डर सरकारने दिलेला आहे. त्यातून दोन कोटी लोकांचे दोनवेळा लसीकरण करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमधील ही घडामोड एकल्यानंतर भारतातील नागरिकांचेही कोरोनावरील लशीकडे लक्ष लागले आहे.