नवी दिल्ली ः देशात कोरोना लसीकरण अभियानानं वेग घेतलेला असताना लसीबाबत पसरवल्या जाणा-या अफवांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लोकांच्या मनातील शंका-कुशंकांचं निरसन केंद्र सरकारनं केलं आहे. आरोग्य मंत्रालयानं लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं काय दिली आहेत, ते पाहूया.
लशीचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो का?
सोशल मीडियावर व्हायरल होणा-या या शंकेला आरोग्य मंत्रालयानं असत्य, तथ्यहीन आणि अफवा म्हटलं आहे. कोविड लशीमुळे वंध्यत्वाचा कोणताही धोका नाही. कोणतीही लस प्रजनन क्षमतेवर परिणाम करत नाही. सर्व लशींचं परीक्षण प्राण्यांवर केलं जातं. जर त्यांच्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम झाल्याचं आढळलं नाही, तर माणसांवर परीक्षण केलं जातं. लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याशिवाय तिला वापरण्याची परवानगी दिली जात नाही.
लसीकरणानंतर काय करणं अपेक्षित आहे?
देशात दिली जाणारी लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लसीकरणानंतर काही तक्रार किंवा त्रास होत असल्यास जवळच्या रुग्णालयात संपर्क करावा किंवा कोविन अॅपवर एसएमएसद्वारे आरोग्य कर्मच-यांना फोन करून संपर्क साधावा.
लस घेण्यापूर्वी कोणतं औषध कधी घ्यावं?
तुम्ही घेत असलेले कोणतेही औषध चालू ठेवावे. आरोग्य मंत्रालयाकडून असे कोणतेही निर्देश नाहीत. फक्त लस घेताना आरोग्य कर्मचार्याला याबाबत माहिती द्यावी.
रक्तस्त्रावसंदर्भातील आजार असल्यास कोणती सतर्कता बाळगावी?
हिमोफिलियासारख्या रक्ताच्या आजार असलेल्या रुग्णांनी जे डॉक्टर उपचार करत आहेत, त्यांच्याकडूनच लस घ्यावी, अशी सूचना आरोग्य मंत्रालयानं केली आहे. रक्तस्त्रावाच्या आजारावर उपचार सुरू असताना रुग्णांनी लस घेऊ नये. रुग्णालयातून सुटी झाल्यावर लस घेऊ शकता. हृदय आणि मेंदूच्या आजाराचे रुग्ण अॅस्पिरिन किंवा प्लेटलेट औषधं घेत असताना लस घेऊ शकतात.
अतिताण, मधुमेह, किडनी विकार, हृदयविकाराचे रुग्ण लस घेऊ शकतात?
एक किंवा एकाहून अधिक आजार असलेल्या रुग्णांसाठी कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. ज्यांना उपरोक्त आजारांचा त्रास आहे, अशा रुग्णांना लसीचा अधिक फायदा होणार आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. तरीही तुमच्या मनात काही शंका असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
जुने आजार असलेल्या रुग्णांना लस देणार का?
जुन्या आजारांसह कार्डियक, न्यूरोलॉजिकल, पल्मोनरी, मेटाबोलिक, रिनल आणि मॅलिग्नेसीज अशा आजारांच्या रुग्णांना लस देऊ शकतात. ही लस त्यांना गंभीररित्या कोरोना संसर्ग आणि अवेळी मृत्यूपासून लोकांना वाचवू शकते, असा पुनरुच्चार आरोग्य मंत्रालयानं केला आहे.
कोरोनातून बरे झालेल्यांनी लस घ्यावी का?
शरीरातील प्रतिकारक्षमता किंवा प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) विकसित होण्यासाठी किती वेळ लागतो आणि ते शरीरात किती काळ टिकू शकतात याबाबत अद्याप काहीच सिद्ध झालं नाहीये. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या लोकांनीही लस घ्यावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. कोरोनातून बरं झाल्यानंतर लस घेण्यासाठी चार ते आठ आठवड्यांची वाट पहावी.
औषधांमुळे अॅलर्जीचा त्रास असलेल्यांनी लस घ्यावी का?
ज्या कोणाला औषधांनी किंवा सुईची अॅलर्जीची समस्या आहे, अशा लोकांचा वेगळा गट तयार करण्यात आला आहे. या गटातील लोकांना लस न घेण्याचा सल्ला दिला जातो.