नाशिक – कोविड-१९ महामारीवर उपाययोजना म्हणून ४५ ते ६० व त्यापुढील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरूवात झाली असून या वयोगटातील कोमॉर्बिड नागरिकांनी लसीकरणासाठी येतांना काळजी घ्यावी. तसेच आपल्या घराच्या जवळील शासकीय लसीकरण केंद्रावर जावून लस घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, लसीकरणासाठी जाण्यापूर्वी नाष्टा किंवा जेवण करून नियमीत औषधे घेण्यात यावीत. ६० वर्ष वय पूर्ण असलेल्या व्यक्तिंनी जन्मतारखेचा पुरावा म्हणून पॅनकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र इत्यादी मूळ प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे ४ ते ६० वयोगटातील उच्च रक्तदाब, डायबेटीस व इतर गंभीर आजार असणाऱ्या कोमॉर्बिड नागरिकांनी लसीकरणाच्या वेळी येतांना विहित नमुन्यातील स्वत:स असे आजार असल्याचे पुरावे सोबत आणणे गरजेचे आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची बाटली व सोबतीला तरूण नातेवाईक आणि नियमीत सुरू असलेली औषधे सोबत ठेवावीत.
लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्याची मर्यादा लक्षात घेता दिलेल्या वेळेतच लसीकरणासाठी उपस्थित रहावे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रावखंडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालय पश्चिम वार्डअंतर्गत येत असल्याने तेथील नागरिकांनीच जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरणासाठी यावे, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रावखंडे शासकीय प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.