नवी दिल्ली – कोरोनाचा रुग्ण आढळला तरीही आता सरकारी आणि इतर कार्यालये बंद किंवा सील केले जाणार नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, कार्यालयांना पूर्णपणे संसर्गमुक्त केल्यानंतर तिथं पुन्हा काम करता येऊ शकणार आहे.
काम करण्याच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नवे मार्गदर्शक तत्व जारी केले आहेत. तसंच सर्व केंद्रीय कर्मचार्यांनी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे निर्देश श्रमिक मंत्रालयानं दिले आहेत.
संसर्गमुक्त करावे लागणार कार्यालये
कार्यालयांमधील एक किंवा दोन कर्मचार्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर ते ज्या जागांवर बसतात आणि ४८ तासात कार्यालयांमधील ज्या ज्या ठिकाणी गेले होते, फक्त तोच परिसर किंवा जागा पूर्णपणे सॅनिटाइझ करून संसर्गमुक्त करावा. कामाच्या ठिकाणी संसर्गाचे अधिक रुग्ण आढळले, तर पूर्ण ब्लॉक किंवा इमारतीला संसर्गमुक्त करावा लागेल, असं नव्या मार्गदर्शकतत्वांनुसार सांगण्यात आलं आहे.
त्वरित उपाययोजना कराव्यात
कार्यालयांमध्ये कर्मचार्यांचे काम करण्याच्या जागा, कॉरिडोअर, पायर्या, लिफ्ट, पार्किंग, कॅन्टिन, मीटिंग रुम, कॉन्फरन्स हॉल जवळजवळ असतात. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि येणार्या-जाणार्या नागरिकांना संसर्गाचा धोका अधिक असतो. या पार्श्वभूमीवर कार्यालयात कोरोना रुग्ण आढळला तर संसर्ग रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
कंटेन्मेंट झोनमध्ये बंद राहणार कार्यालये
कंटेन्मेंट झोनमधील सर्व कार्यालये बंद राहणार आहेत. फक्त मेडिकल आणि आवश्यक सेवा सुरू राहतील. कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील कार्यालये खुले करण्याची परवानगी असेल, असं आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
मास्क आणि अंतर ठेवणं गरजेचं
देशात कोरोना रुग्णांमध्ये घट होत असली तरी निष्काळजीपणा महागात जाऊ शकतो. या मुळेच श्रमिक मंत्रालयानं सांगितलं की, कार्यालये असो किंवा परिसर असो गरजेनुसार, सहा फुटाचं अंतर राखणं आणि मास्क घालणं बंधनकारक आहे. वेळोवेळी २० ते ४० सेकंद हात धुणंही महत्त्वाचं आहे.
थर्मल स्क्रीनिंग आवश्यक
कार्यालयांमध्ये नियमित हॅंड सॅनिटायझरचा उपयोग करणं आवश्यक आहे. कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्वांचे थर्मल स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. कार्यालयांच्या बाहेरही सॅनिटायझर ठेवण्याची व्यवस्था करावी. लक्षणं नसलेल्या कर्मचारी किंवा आगंतुकांना प्रवेश करण्याची परवानगी देण्यात यावी, असं आदेशात म्हटलं आहे.
कोरोनाग्रस्तांना विलगीकरणात ठेवावं
सर्व आवश्यक काळजी घेतली तरी कोरोना रुग्ण आढळल्यास कार्यालय व्यवस्थापनानं त्यांना त्वरित वेगळ्या खोलीत किंवा परिसरात ठेवावं. अशा कार्यालयांमधील जोखीम किती आहे, याबाबत आरोग्य विभाग उपाययोजना करेल. त्यांच्याच सूचनांनुसार रुग्णांवरील उपचार, संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी आणि कार्यालयांना संसर्गमुक्त करण्याच्या उपाययोजना कराव्या लागतील.