नाशिक: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढ होत असल्याने वैद्यकीय कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे डॉक्टरांवर आणि सध्या कार्यरत असलेल्या अन्य कर्मचार्यांवर कामाचा मोठा ताण वाढला आहे. या संबंधी माहिती देताना वैद्यकिय अधिकाऱ्याने सांगितले की, आरोग्य क्षेत्रात डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांची सुमारे ६० टक्के पदे अद्याप रिक्तच आहेत. तसेच डॉक्टर आणि इतर कर्मचारी अर्ज न करण्यामागील मुख्य कारण म्हणजे कोविड सुविधांमधील नोकऱ्या या कंत्राटी पद्धतीने असतात. जुलैमध्ये २०० डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी भरती करण्याची जाहिरात दिली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाशिक सिव्हिल हॉस्पिटल व ग्रामीण रूग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येतात. ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांना गरज भासल्यावर खासगी डॉक्टरांची मदत घेण्यास सांगण्यात आले आहे, परंतु त्यापैकी अनेक खासगी डॉक्टर बर्याच वेळा स्वत: च्या कामाच्या ताणामुळे उपलब्ध नसतात. त्यामुळे लवकरात लवकर पदे भरण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाशिक सिव्हिल हॉस्पिटल आवारात समर्पित कोविड हॉस्पिटल (डीसीएच) व्यतिरिक्त, जिल्हाभरात अनेक समर्पित कोविड आरोग्य केंद्रे (डीसीएचसी) आहेत.लवकरच जिल्ह्यातील विविध भागात आणखी दहा डीसीएचसी स्थापन केल्या जातील. त्यामुळे या सुविधांमध्ये डॉक्टर आणि इतर वैद्यकीय व नॉन-वैद्यकीय कर्मचार्यांची गरज भासणार आहे, असे त्यांनी सांगितले.