नाशिक – शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले कोरोना योद्धेच गेल्या दोन महिन्यांपासून वंचित असल्याची बाब महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली आहे. कोरोना योद्धे सर्वस्व झोकून काम करीत असताना त्यांना वेतनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याने महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चर्चेचा ठरला आहे.
सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने स्थायीची सभा गुरुवारी झाली. यात विविध विषयांवर स्थायी समिती सदस्यांनी मुद्दे मांडले. कोरोनासाठी मानधनावर घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन पी एफ नंबर घेऊन त्वरित अदा करण्यात यावे. कार्यकारी अभियंता देवेंद्र वनमाळी यांच्या बाबतचा सविस्तर अहवाल पुढच्या स्थायी समिती सभेत सादर करावा व त्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे गीते यांनी निर्देश दिले.
ऑक्सिजन प्लान्ट धीम्या गतीने
मनपाच्या बिटको हॉस्पिटल मध्ये २० हजार लिटर, डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये १० हजार लिटर ऑक्सिजन टाकी बसवण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम लवकरात लवकर करावे, असे निर्देश देण्यात आले. ज्या हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्ण उपचारासाठी दाखल असतील त्याच हॉस्पिटलमध्ये ऑडिटर नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीत कोविड रुग्णांवर केले जात असलेले उपचार व नियोजन याबाबत सविस्तर माहिती वैद्यकीय (आरोग्य) विभागाकडून घेण्यात आली. महिला व बालकल्याण विभागाच्या प्रशिक्षणाबाबतच्या विषयाचे डॉकेट पुढील स्थायी समितीवर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
स्मार्ट काम धीमे
शहरात स्मार्ट सिटीचे काम संथ गतीने सुरू असून याबाबतची सविस्तर माहिती येत्या महासभेत स्मार्ट सिटी चे कार्यकारी अधिकारी यांच्याकडून घेण्यात येणार असल्याचे गीते यांनी या बैठकीत सांगितले. बैठकीस स्थायी समिती सदस्य सुधाकर बडगुजर, अशोक मुर्तडक, राहुल दिवे, सत्यभामा गाडेकर, कमलेश बोडके, कल्पना पांडे, समीना मेमन, सुनीता कोठुळे, स्वाती भामरे, राकेश दोंदे, प्रा शरद मोरे, सुप्रिया खोडे, हेमंत शेट्टी, रुपाली निकुळे आदी उपस्थित होते.
खड्डे बुजवा
स्थायीच्या सभेत शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा मुद्दा चांगलाच गाजला. महापालिका बुजविलेल्या खड्ड्यांची आकडेवारी देते मग खड्डे का दिसत आहेत, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. त्याची दखल घेत शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या.