नाशिक – खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांची तपासणी करण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलणे, विभागानुसार भरारी पथके स्थापन करणे, नागरिकांना सुविधा मिळावी या दृष्टीने हेल्पलाइन क्रमांक सुरू करणे, असा ठराव महापालिकेच्या स्थायी समितीच्या विशेष कोरोना सभेत करण्यात आला.
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यासंदर्भात स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कोरोना सभा शुक्रवारी (११ सप्टेंबर) झाली. त्यात विविध प्रकारचे निर्णय घेण्यात आले. अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टेकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे व अधिकाऱ्यांनी सदस्यांनी विचारलेली माहिती दिली. सभेस स्थायी समिती सदस्य सुधाकर बडगुजर,अशोक मुर्तडक, राहुल दिवे, सत्यभामा गाडेकर समीना मेमन, सुनीता कोठुळे, स्वाती भामरे, राकेश दोंदे, कमलेश बोडके, प्रा शरद मोरे, कल्पना पांडे, सुप्रिया खोडे, हेमंत शेट्टी आदी सदस्यांसह अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, मुख्य लेखा परीक्षक बी.जे. सोनकांबळे, उपायुक्त करूणा डहाळे, डॉ. राजेंद्र त्रंबके, घनकचरा व्यवस्थापन संचालक कल्पना कुटे, नगरसचिव राजू कुटे आदी उपस्थित होते.
सभेत झालेले ठराव असे
– खाजगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करून विभागनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
– नियमानुसार खाजगी रुग्णालय कामकाज करत नसल्यास त्याबाबत खात्री करून त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करावी.
– सर्वसामान्य रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.
– मनपाचे बिटको हॉस्पिटल हे अद्ययावत व सुसज्ज करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलून त्या ठिकाणी ३ महिन्याच्या आत ऑक्सिजन प्लान्ट उभा करावा.
– प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजेन तपासणी करण्याची व्यवस्था करावी
– मनपाचे स्वतःचे फिजिशियन देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु करावी त्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करून नियोजन करावे तोपर्यंत मानधनावर फिजिशियन नेमावेत.
– मनपाकडून खाजगी रुग्णालयाकडे पाठवण्यात आलेल्या रुग्णांसाठी टोकन सिस्टीम कार्यन्वित करण्यात यावी.
– बिटको हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करावे.
– कोरोना नियंत्रित झाल्यावर या ठिकाणी नाशिक महापालिकेचे स्वतंत्र मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा.
– कोरोनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ५ लाखापर्यंतचा मेडिक्लेम काढण्यात यावा.
– एमआरआय,सिटी स्कॅन एक्सरे आठवड्याभरात सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.
– खाजगी रुग्णालयांमध्ये केला जाणारा औषध उपचार व रुग्णांच्या नातेवाईकांना त्या रुग्णाबाबतची माहिती मिळण्याच्या दृष्टीने खाजगी रुग्णालयांना सूचना द्याव्यात.
– मनपाच्या रुग्णालयांमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याच्या दृष्टीने महापालिका स्तरावर कार्यवाही करावी.
– मुलतानपूरा हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी
– कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने सर्व डॉक्टरांची एक बैठक घेऊन त्याबाबत योग्य पद्धतीने नियोजन करावे
– विद्युत दाहिनी बाबत कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी
– नवीन एक विद्युत दाहिनी तयार करावी.
– ॲम्बुलन्स बाबत कमतरता जाणवू नये यासाठी त्यांची संख्या वाढवावी.
– कोरोना रुग्णालयात केली जाणारी भोजन व्यवस्था उत्तम असावी. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मक्तेदार नेमावेत जेणेकरून उत्तम भोजन रुग्णांना देता येईल