मुंबई – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हरकती अशा काही असतात की जगभरात त्यांचे महिन्यातून दोनदा तरी हसे होत असते. किंवा इम्रान यांच्या मुर्खपणाची तरी चर्चा होतेच. अलीकडेच असाच एक मुर्खपणा त्यांनी केला आणि त्यासाठी चांगलीच टीकाही सहन करावी लागत आहे. कोरोना झालेला असतानाही या महाशयांनी आपल्या मिडीया टीमची बैठक बोलावली आणि त्याला प्रत्यक्ष उपस्थित राहिले. देशाला ज्ञान पाजळणाऱ्या पंतप्रधानाने असा मुर्खपणा करावा, याबाबत पाकिस्तानात आश्चर्यही व्यक्त होत आहे.
गेल्याच आठवड्यात इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. संक्रमण होण्याच्या अगदी काही दिवसांपूर्वीच इम्रान यांनी व्हॅक्सीन लावले होते, हे विशेष. माहिती व प्रसारण मंत्री शिबली फराज आणि आणि खासदार फैजल जावेद यांनीही इम्रान यांच्यासोबत बैठकीत भाग घेतला होता. या बैठकीची छायाचित्रे त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केल्यामुळे इम्रान यांच्यावर टीका होऊ लागली. इम्रान खान आपल्या टीमसोबत चर्चा करीत असताना या छायाचित्रांमध्ये दिसत आहेत.
बनिगाला येथील आपल्या निवासस्थानी इम्रान यांनी बैठक घेतली, यापेक्षा मोठा मुर्खपणा तर कुठलाच नाही. इम्रान यांनी स्वतःच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल व्हायला हवा, अशी मागणी विरोधीपक्षाने केली आहे.
आयसोलेशनमध्ये असताना बैठक घेण्यामागचे कारण कोणत्याही सरकारी प्रवक्त्याला सांगता आले नाही. संक्रमित असताना बैठक घेणे, ती देखील आपल्या निवासस्थानी आयोजित करणे आणि वरून देशाला काळजी घेण्याचे आवाहन करणे असा अफलातून उपक्रम राबविणारे इम्रान हे जगातील एकमेव पंतप्रधान असावे.