कोरोना हा इतर आजारांप्रमाणेच एक आजार आहे, फक्त त्यावर अद्याप नेमके औषध उपलब्ध नाही. तरीदेखील वेळीच खबरदारी घेतली आणि उपचार घेतल्यास त्यावर सहजपणे मात करता येते. असे असताना बऱ्याचदा कोरोनाबाधितांना समाजात योग्य वागणूक मिळत नाही. त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. त्यांना सहकार्याची आवश्यकता असताना त्यांना दूर ठेवण्याचे प्रकारही समोर येतात. लक्षात असू द्या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातून सहकार्य अपेक्षित आहे.
शासनाने कोरोना संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला. या कालावधीत काही निर्बंधही टाकण्यात आले आहेत. परंतू त्यांचे पालन न झाल्याने विशेषत: शारीरिक अंतराचे पालन न झाल्याने संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यामुळे एखादी इमारत, सोसायटी, वस्ती आदी ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनीदेखील आपली जबाबदारी समजावून घेणे आवश्यक आहे.
सोसायटी, वसाहतींमध्ये घ्यावयाची काळजी
* सोसायटी, वसाहतींमध्ये वावरताना प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक असावे.
* घराबाहेर पडताना प्रत्येकाने सॅनिटायझर, मास्क व हातमोज्यांचा योग्यरित्या वापर करुन बाहेर पडावे.
* सोसायटीतील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे.
* सोसायटी, वसाहतीमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर राखूनच संवाद साधावा.
* सोसायटींमधील प्रतीक्षागृहाचा शक्यतो उपयोग करु नये, ते बंद राखावे.
* सोसायटीत दरवाज्याचा कडीकोयंडा, कठडे (हॅण्ड रेलिंग) लिफ्ट, बाक, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे शक्यतो टाळावे.
* सोसायटीतील उद्धाहन (लिफ्ट) चा उपयोग करताना हातात कागद ठेवावा, लिफ्टची बटणे दाबताना कागदी कपट्याचा उपयोग करावा. असे कागदी तुकडे लगेच काळजीपूर्वक कचऱ्याच्या डब्यात टाकावेत.
* सोसाटीतून/वसाहतीतून पुन्हा घरात येताच कुठेही स्पर्श न करता सर्वात आधी सॅनिटायझरने/साबणाने हात स्वच्छ धुवावेत.
* सोसायटीमध्ये किंवा परिसरात बाहेरील कोणत्याही व्यक्तिला थेट प्रवेश देऊ नये.
* बाहेरुन येणारे मदतनीस, वाहन चालक, कचरा संकलक, सफाई कर्मचारी यांच्यासाठी शारीरिक तापमान तपासणी, प्राणवायू तपासणी, हात स्वच्छ धुण्याची सोय आदी बाबी उपलब्ध असल्याची खातरजमा करावी.
* ऑनलाईन पार्सल थेट घरात न मागवता, सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे, सुरक्षित अशा एकाच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. तेथून निर्जंतुकीकरण करुन ते घरात न्यावे. शक्य असल्यास काही तास ते पार्सल खुल्या जागेत, उन्हात राहू द्यावे आणि नंतर घरात न्यावे.
* सोसायटीतून बाहेर पडताना वाहनांना स्पर्श करण्यापूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण करावे.
* नजीकचे नगरपालिका, आरोग्य केंद्र, रुग्णालय, जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष, आदी महत्वाचे संपर्क क्रमांक इत्यादी ठळकपणे दिसतील अशारितीने सोसायटी परिसरात प्रदर्शित करावे.
*वसाहतीमध्ये एखाद्या घरात बाधित व्यक्ती असल्यास त्या कुटुंबाचे मनोबल वाढविण्यासाठी सहकार्य करावे, त्यांच्यात सकारात्मकता वाढविण्याचे प्रयत्न करावे.
*दाटीवाटीच्या वस्तीत गर्दी करू नये, परिसरात एखाद्या व्यक्तीत आजाराची लक्षणे असल्यास त्यास रुग्णालयात तपासणी करण्यासाठी प्रेरित करावे.
*भाजी विक्रेते किंवा दूध विक्रेते कोरोनाविषयक नियमांचे पालन करतील याची दक्षता घ्यावी.
कोरोनाचा लढा सर्वांनी मिळून लढायचा आहे. आपला परिसर कोरोनामुक्त करण्यासाठी एकत्रित प्रयत्न उपयुक्त ठरतील. कोरोनाला घाबरून नव्हे तर योग्य दक्षता घेऊनच हे शक्य होईल. त्यामुळे परिसरात याविषयी जनजागृती करा. प्रतिबंधीत क्षेत्र घोषित झाल्यावर आवश्यक कालावधीसाठी निर्बंधाचे पालन करा. परस्पर सहकार्य आणि कोरोनाबाधितांविषयी सहानुभूतीची भावना ठेऊन आपला परिसर कोरोनामुक्त करू या.!
(साभार – जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार)