कोरानापासून कुटुंबाचा बचाव करण्यासाठी वैयक्तिक सवयी महत्वाच्या आहेच, मात्र कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी संवाद आणि एकमेकांची काळजी घेणे तेवढेच महत्वाचे आहे. एखाद्या कुटुंबात अतिजोखमिच्या, एखादा आजार असलेल्या किंवा ६० पेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती असल्यास असे सहकार्य आवश्यक ठरते.
कुटुंबातील एकाही सदस्याला संसर्ग झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो. कोरोनाचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जाण्याची शक्यता अधिक असते. घर लहान असले की ही शक्यता वाढते. त्यामुळे कुटुंबाच्या सर्व सदस्यांनी एकत्रितपणे कोरोना विषयक सुचनांचे पालन केल्यास त्याचा लाभ सर्वांनाच होईल. त्यामुळे कौटुंबिक पातळीवर काय खबरदारी घ्यावी हे जाणून घ्या.
कौटुंबिक स्तरावर घ्यावयाची काळजी
* कुटुंबात वावरताना कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे, सुचनांचे अनावधानाने कोणाकडून उल्लंघन होत असल्यास ते एकमेकांच्या लक्षात आणून द्यावे.
* प्राणवायू पातळी मोजण्यासाठी आवश्यक असलेले उपकरण (ऑक्सिमीटर ) सदैव बाळगावे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्राणवायू पातळी ठराविक कालावधीने तपासून त्यांच्या अचूक नोंदी ठेवाव्यात.
* शारीरिक तापमापक, थर्मल स्क्रीनिंग गन घरात बाळगावे.
* घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रकृतीमानाकडे विशेष लक्ष पुरवावे.
* घरातील सहव्याधी (को-मॉर्बिडीटी) असणारे सदस्य नियमितपणे औषधोपचार घेतील, त्यांची प्रतिकारशक्ती टिकून राहील, याची काळजी घ्यावी.
* कुटुंबात एकत्र सोबतीने जेवायला बसताना समोरासमोर न बसता एका बाजूला एक याप्रमाणे बसावे.
* शक्यतो घरातील एकाच सदस्याने कौटुंबिक कामांसाठी बाहेर ये-जा करावी व त्या सदस्याने अशी ये-जा करताना संपूर्ण दक्षता घ्यावी.
* घरातील प्रत्येक सदस्याने दररोज स्वच्छ कपडे परिधान करावेत, नु धुता कपड्यांचा पुन्हा वापर करु नये.
* भ्रमणध्वनीसारख्या वैयक्तिक वापराच्या वस्तू कुटुंबातील सदस्यांनी एकमेकाकडे घेऊन, अदलाबदली करुन वापरु नयेत. अशा वस्तूदेखील योग्यरित्या स्वच्छ राहतील याची काळजी घ्यावी.
* खाद्यपदार्थांचे पार्सल मागवले असल्यास ते स्वयंपाकगृहात खूप वेळ राखून ठेवू नये. पदार्थ काढून झाल्यानंतर आवरण, डबे आदींची तातडीने विल्हेवाट लावावी.
* बाजारातून आणलेल्या भाज्या,फळे आदी स्वच्छ धुवून ठेवावेत. नंतरच त्याचा आहारात समावेश करावा.
* ऑनलाईन, बाहेरुन पार्सल मागवले असल्यास आणि नाशवंत पदार्थ नसतील तर किमान एक दिवस ते पार्सल तसेच ठेवून द्यावे. त्यावर निर्जंतुकीकरण द्रव्य फवारावे व दुसऱ्या दिवशी ते उघडावे.
* घरातील फरशी, स्वयंपाकगृह, प्रसाधनगृह, शौचालय निर्जंतुकीकरण द्रव्याचा वापर करुन स्वच्छ ठेवावीत.
*भारतीय बनावटीचे शौचालय असल्यास ते व्यवस्थित स्वच्छ राखावे. पाश्चात्य बनावटीच्या शौचालयातील भांड्यावरील झाकण फ्लश करताना बंद ठेवावे.
* नातेवाईक मित्र इत्यादींकडे जाणे टाळावे.
कुटुंबातील भावनीक गुंफण नाजूक असते. एका व्यक्तीला संसर्ग झाला तर घरातील इतरांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशी वेळच येऊ नये म्हणून आपली जबाबदारी ओळखून वेळीच खबरदारी घेतल्यास लॉकडाऊनच्या काळात कुटुंबातील सदस्यांच्या आनंददायी सहवासाचा अनुभव घेता येईल आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे तुमच्या एकजूटीमुळे कोरोना उंबरठ्याबाहेरच राहील.
(साभार – जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार)