नवी दिल्ली – कोरोनाची दुसरी लाट देशात पसरू लागली असल्याने सर्व राज्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी विमान प्रवाशाने प्रवासादरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यास एअरलाइन्सकडून कठोर कारवाई केली जाईल. इतकेच नव्हे तर कोरोना निर्बंधाचे उल्लंघन केल्यास आयुष्यभर विमान प्रवास बंदी घालण्यात येणार आहे.
कोविड -१९ च्या नियमांचे पालन न करणाऱ्या आठ प्रवाशांना वेगवेगळ्या विमानातून उतरविण्यात आले आहे. या सर्व प्रवाश्यांनी मास्क आणि पीपीई किट घालण्यास नकार दिला होता. गेल्या एका आठवड्यात तीन विमान कंपन्यांसह अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
दिल्लीहून हैदराबादला जाणार्या इंडिगो विमानातील महिला प्रवाशाने मास्क घालण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे दिल्ली ते गोवा या विमानात दुसर्या प्रवाशानेही मास्क घालण्यास नकार दिला. या दोन्ही प्रकरणात इंडिगोने प्रवाशांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
याशिवाय एअर एशिया इंडियाने दोन लोकांच्या प्रवासावर बंदी घातली. गोवा ते मुंबईकडे प्रवासी जात होते आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या दोन प्रवाशांची मधली सीट असल्याचे आढळले, त्यांना पीपीई किट घालण्यास सांगितले, मात्र त्यांनी ते परिधान करण्यास नकार दिला.
तसेच जम्मू-काश्मीर विमानातील चार प्रवाशांना सुरक्षा रक्षकांकडे सुपूर्द केले. कारण केबिन क्रू आणि पायलटकडून वारंवार अपील करूनही या चौघांनी मास्क घालण्यास नकार दिला.
प्रवासी जर कोरोना नियमांचे पालन करीत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर आजन्म प्रवासासाठी बंदीही होऊ शकते. त्यामुळे आपण विमान प्रवास करणार असाल तर कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.