नवी दिल्ली – अनेक प्रयत्न केल्यानंतरही कोरोना संसर्गाचा वेग कमी होत नसल्याने तसेच लसीकरण अभियान पाहिजे त्या प्रमाणात वेगाने होत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (४ एप्रिल) उच्च अधिकार्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, कोविड नियमांचे पालन आणि लसीकरण या पाचसूत्रीय नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. अधिक रुग्ण आणि मृत्यूदर असलेल्या महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडसाठी तत्काळ केंद्रीय पथके रवाना करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महामारीमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठीच्या आवश्यक पावले उचलण्यावर भर देण्यात आला.
आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोरोना लसीची उपलब्धता, लस उत्पादन आणि सध्याचा लसीचा साठा तसेच नव्या लसीवर सुरू असलेल्या परीक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. देशात सध्या लसीची कमतरता नसून, लस निर्माती कंपनी आपली क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच देशातील लसीची वाढती मागणी आणि परदेशात लसीचा पुरवठा करण्यासाठी उत्पादन करणार्या नव्या कंपन्याही प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न
बैठकीत कोरोना लसीकरणाचा वेग वाढत नसल्याबाबत चर्चा करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी ३६.७ लाख डोस देण्यात आले. परंतु त्यानंतर लसीकरणाचा वेग मंदावला. दर दिवशी ५० लाख नागरिकांच्या लसीकरणाचे सरकारचे लक्ष्य आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य मंत्रालय राज्य सरकारांच्या संपर्कात असून, लसीकरणाच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी मदत केली जात आहे.
महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये होत असलेल्या गंभीर परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली. गेल्या १४ दिवसात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात ४७ टक्के रुग्ण आहेत. तसेच १४ दिवसांमधील एकूण मृत्यूंपैकी महाराष्ट्रात ४७ टक्के मृत्यू आहेत. पंजाबमध्ये ४.५ टक्के कोरोनाचे रुग्ण आढळले असून, मृत्यूंचा दर १६.३ टक्के आहे. छत्तीसगडमध्ये ४.३ टक्के रुग्ण आढळले असून, मृत्यूचा दर ७ टक्के आहे. या तिन्ही राज्यात केंद्रीय पथके पाठवण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले.
मास्कसाठी विशेष अभियान
बैठकीत मास्कचा वापर करण्यासाठी भर देण्यात आला. १०० टक्के मास्कचा वापर करण्यासह सार्वजनिक ठिकाणी आणि आरोग्य केंद्रांवर स्वच्छतेसाठी ६ एप्रिल ते १४ एप्रिलपर्यंत देशात विशेष अभियान चालविले जाणार आहे. गेल्या १५ महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाणारा नाही, यासाठी कोरोनाविरोधातील लढा मिशन मोडवर सुरू राहिला पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले.