पुणे – पुणे आणि परिसरातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरातल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार त्याचबरोबर नाट्य, चित्रपट गृह आणि मॉल्स आजपासून रात्री १० वाजता बंद करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
आगामी काळात कोरोना प्रतिबंधक नियमावलीचं काटेकोरपणे पालन केलं जाणार असून त्याचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पवार यांनी या बैठकीत दिले.
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्याबद्दलची माहिती दिली. रात्री १० नंतर पुढील तासभर हॉटेलमधून पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे मात्र हॉटेलमध्ये बसून जेवता येणार नसल्याचं राव म्हणाले.
शहर आणि परिसरातील विवाह समारंभ, त्याचबरोबर अन्य राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, आंदोलनं, अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमांना ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली असून त्यापेक्षा जास्त लोक आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं राव यांनी सांगितलं.
मंगल कार्यालयं सील करण्याचा इशाराही त्यांनी दिला. शहर आणि परिसरातील शाळा , महाविद्यालयं आणि अन्य कोचिंग क्लासेस येत्या ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याशिवाय शहरातील उद्यानान केवळ सकाळच्या वेळीच खुली राहणार असून सायंकाळी पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत.
सध्या रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत असलेली संचारबंदी यापुढील काळातही सुरु राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणीही त्याकाळात बाहेर फिरताना आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकानं, रस्त्यावरील खाद्य पदार्थांची विक्री करणारे स्टॉल देखील रात्री १० वाजताच बंद करण्यात येतील, असं राव यांनी स्पष्ट केलं.
परभणी जिल्ह्यातही आज मध्यरात्रीपासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज दिले. संचारबंदीच्या काळात सर्व शासकीय आणि खासगी दवाखाने, औषध दुकानं, लसीकरण केंद्र, चाचणी केंद्र, आपत्कालीन व्यवस्था, शासकीय वाहनं, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेले वाहने, माध्यमांचे प्रतिनिधी, पेट्रोलपंप आणि गॅस वितरकांना सूट राहणार आहे.
दूध विक्रेत्यांना सकाळी ६ ते ९ या वेळेत दूध विकता येणार आहे. आरटीपीसीआर, ऍन्टीजन चाचणी करण्यासाठी जाणार्या व्यक्तींना, परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी तसंच महाविद्यालयाचे शिक्षक आणि कर्मचारी, यांनाही सूट मिळणार आहे.