नवी दिल्ली – भारतातील नागरिकांसाठी मोठी खुषखबर आहे. कोरोनाची दुसरी लाट येईल, असे वारंवार सांगितले गेले. अमेरिका, इटली आणि जर्मनीसह इतर देशांमध्ये सध्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे तेथे कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र, भारतात दुसरी लाट येणार नसल्याचे केंद्र सरकारच्या तज्ज्ञ गटाने स्पष्ट केले आहे.
सदर गट हा गणिताच्या मॉडेल्सवर आधारित कोरोना इन्फेक्शनवर सतत नजर ठेवतो. त्यांचा असा विश्वास आहे की, पुढच्या वर्षी फेब्रुवारी २०२१ पर्यंत हा विषाणू मोठ्या प्रमाणात स्थिर होईल आणि केवळ २० हजार रुग्ण सक्रिय असतील. या गटाने नुकतेच सुपर मॉडेलवर आधारित कोरोना इन्फेक्शनच्या भविष्याचा अभ्यास केला. या गटात सीएमसी वेल्लोर किट्टीचे तज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग, आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक विद्यासागर, भारतीय विज्ञान संस्थान बंगळुरूचे प्राध्यापक बिमान बागची, कोलकाताचे भारतीय सांख्यिकी संस्था अरुप बोस आणि कानपूर आयआयटीचे प्राध्यापक मणिपुर अग्रवाल यांचा समावेश आहे.
अंदाज अचूक नाही
आयसीएमआरचे माजी संचालक डॉ रमण गंगाखेडकर म्हणतात की, गणिताच्या मॉडेल्सच्या आधारे संसर्गाची स्थिती मानली जाऊ शकत नाही. कोरोना जेव्हा चीन, अमेरिका आणि इटलीसारख्या देशांमध्ये पसरला, तेव्हा गणिताच्या अंदाजानुसार भारतात परिस्थितीचा अंदाज लावला जात होता, परंतु कोरोनाचे आगमन झाल्यानंतर या देशाची वेगळी परिस्थिती दिसत आहे जी इतर देशांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, भारतात पुन्हा संसर्गाची मोठी लाट येणे कठीण आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात तयारी पूर्ण करणे.