नवी दिल्ली – दिल्लीसह देशाच्या सर्व भागांमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असल्याबद्दल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी चिंता व्यक्त केली आहे. लोकांच्या मनातील कोरोनाबद्दलची भिती नष्ट झाल्यामुळेच रुग्ण वाढत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बाहेर फिरणे, शॉपिंगला जाणे शक्य नाही, याचे लोकांना दुःख आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी ज्या नियमांचे पालन आवश्यक आहे, ते नियम पाळणेच लोकांनी सोडून दिले, असेही ते म्हणाले.
अनेक लोकांनी तर मास्क लावणेच बंद करून दिले. कोरोना विषाणू कुठेच गेला नव्हता. त्यामुळे आपण गाफिल होताच त्याने पुन्हा आक्रमण केले. विषाणू जसा जसा वाढेल तसे तसे त्याचे नवे स्ट्रेन बनत राहतील, असा गंभीर इशारा डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे.










