नवी दिल्ली – कोरोना विषाणू हा नाक आणि तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करून श्वसन प्रणालीवर आघात करतो, असे सांगितले जाते. मात्र, आता आणकी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे, कोरोना डोळ्यातूनही शरिरात प्रवेश करु शकतो. चीनमधील ६४ वर्षीय महिलेच्या डोळ्यात कोरोनाचा विषाणू सापडला आहे. कोविडपासून बरे झाल्यानंतर दोन महिन्यांनंतर तिच्या डोळ्यामध्ये कोरोनाचा विषाणू आढळून आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात एका ६४ वर्षीय वृद्ध महिलेस कोरोना संसर्ग झाला होता. त्यात खोकला आणि तत्सम लक्षणे दिसून आली होती. ३१ जानेवारीला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या महिलेस कोणतीही गंभीर समस्या जाणवत नव्हती. योग्य उपचार मिळाल्यामुळे तिचा अहवाल निगेटिव्ह आला व त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र, आठ दिवसांनी त्यांच्या डोळ्याला वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्यावर त्यांना तत्काळ दवाखान्यात हलवण्यात आले.
डोळ्यांना काचबिंदूचा झटका आल्याने असे होत असावे असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला मात्र शस्त्रकिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. चीनच्या वुहान येथील सेंटर थिएटर कमांड हॉस्पिटलमध्ये या महिलेवर दोन नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रिया झाल्यावर घेण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणीवरून त्यात कोरोना विषाणूचा प्रोटीन असल्याचे आढळून आले.
जामा नेत्ररोगशास्त्र या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, कोरोना रूग्णांमध्ये ‘ओक्युलर मॅनिफेस्टिव्ह’ झाल्याची घटना घडली आहे. अशावेळी डोळ्यांमध्ये लालसरपणा आणि सूज येते. पूर्वी, आणखी एका संशोधन अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की डोळ्यांच्या वरच्या थरांशिवाय अश्रूंमध्ये कोरोना विषाणू देखील असू शकतो. अश्रूंच्या माध्यमातून देखील कोरोना संसर्ग पसरत असल्याचे वृत्त जगभरातून आले आहे.