नाशिक – कोरोनाचा प्रदूर्भाव वाढत असताना त्याची चाचणीसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळेच चाचणीचे दर थेट निम्म्यावर आले आहेत. दातार कॅन्सर जेनेटिक्स लॅब आणि मविप्रच्या डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेजने दर थेट निम्म्यावर आले आहेत. त्यामुळे खासगीरित्या चाचणी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनाच्या संसर्गाने बाधितांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. खासगी लॅबलाही सरकारने कोरोना चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्याचे दर अधिक असल्याने सरकारने त्याचे दर निश्चित केले. सद्यस्थितीत १९०० ते २५०० रुपये कोरोना चाचणीसाठी लागतात. मात्र, ना नफा, ना तोटा तत्वावर चाचणीसाठी केवळ १ हजार रुपये आकारण्याचा निर्णय दातार लॅबने घेतला आहे. तशी माहिती दातार लॅबचे चेअरमन राजन दातार यांनी दिली आहे. नागरिकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असून १ सप्टेंबरपासून त्याचा लाभ घेता येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. तर, मराठा विद्या प्रसारकच्या डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज, आडगाव यांनीही कोरोना चाचणीचे दर १५०० रुपये केले आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मविप्र सरचिटणीस निलीमा पवार यांनी सांगितले आहे.
इतरही घटवणार
दातार लॅब व मविप्र संस्थेने चाचणीचे दर घटविल्याने अन्य खासगी लॅबकडूनही दर घटविले जाण्याची शक्यता आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना खासगी लॅबकडून चाचणी दर कमी करण्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.