कोरोनाच्या महासंकटात लाडशाखीय वाणी समाजाने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून नानाविध उपक्रम सुरू करुन समाजबांधवांना मोठा दिलासा दिला आहे. एकूण १३ प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात आले असून समाजबांधवांची कोविड सहायता समितीही स्थापन करण्यात आली आहे. त्याचा मोठा फायदा समाजबांधवांना होत आहे. त्यामुळे ही बाब अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्याची माहिती देणारा हा लेख…
सध्या कोविड-१९ या महामारीने संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडले आहे. सध्या कोणत्याही परिस्थितीत माणसाचे आयुष्य वाचवणे व त्याला जगवणे हे अधिक महत्वाचे झाले आहे. यालाच प्राधान्य देऊन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत कोविड सहायता समिती स्थापन केली आहे. सामाजिक जाणिवेतून त्यात विविध गरजांनुसार वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने
१) प्रथम सहाय्यता संपर्क
२) रुग्णासोबत आलेली व कोणताही त्रास नसलेली व रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्या व्यक्तीची राहण्याची व्यवस्था
३) कोरोनाबाधित कुटुंबांना मानसिक आधार देणे
४) डॉक्टर टीमसोबत सुसंवाद
५) कोरोना कवच पॉलीसी बाबत मार्गदर्शन
६) वैद्यकीय साहित्य उपलब्धता
७) रॅपीड चाचणीविषयी मार्गदर्शन
८) औषधी उपलब्धता
९) हॉस्पिटल उपलब्धता
१०) मेडिटेशन विषयी फोनवरून मार्गदर्शन
११) भोजन व्यवस्था
१२) रक्तपुरवठा, प्लाझ्मा
१३) रुग्णवाहिका उपलब्धता
आदी अशा अनेक प्राथमिक मदतीचा समावेश आहे. याचा मोठा फायदा समाजबांधवांना मिळत आहे. तसेच प्रारंभीच्या काळात कोविड-१९ च्या उपाययोजना साठी मदतनिधी म्हणून समाजातील सर्व स्तरातील बांधवांच्या मदतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांच्याकडे त्याचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
कोरोना सारख्या गंभीर महामारीने ओढवलेल्या संकटांवर मात करण्यासाठी व गरजवंताला मदत करण्याच्या सामाजिक आपुलकी व माणुसकीच्या भावनेतून वरील मदतीपैकी एक मदत म्हणून येथील माहेरघर मंगल कार्यालय या वास्तूत रुग्णासोबत बाहेरगावाहून आलेल्या व ज्यांची येथे काहीच सोय नाही अशा लोकांची निवारा व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील बऱ्यापैकी सोयी सुविधा उपलब्ध असलेले केंद्र असलेने बरेच जण ग्रामीण भागातून येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळत नाही, बाहेरून ही मिळणारी कोणतीही सुविधा सध्याच्या नियमावली मुळे मिळत नसल्याने तसेच आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने काही बांधव नैराश्यकडे झुकताना निदर्शनास आले.. विना आंघोळीचे, उपाशीपोटी राहण्याची वेळ आली तर ती व्यक्ती दाखल केलेल्या रुग्णाकडे काय लक्ष देणार..? असा सर्व बाबींचा विचार करून कोणताही त्रास नसलेली व निगेटिव्ह रिपोर्ट असलेली व्यक्ती येथे निवास करू शकते. त्याची भोजनाची सोय केली तर त्यास तेवढाच एक आधार मिळेल.
शेवटी प्रशासनासही मर्यादा आहेत, ते कुठे कुठे मदत करणार, मदतीसाठीही आता कोणी पुढे येण्याचे धाडस दाखवत नाही, अशा परिस्थितीत आम्ही प्रशासनाच्या सर्व नियमांचा आदर करत एका निराधाराचा आधार बनण्याचा प्रयत्न केला आहे, कोणालाही त्रास होऊ नये, याची आम्ही पूर्णतः खबरदारी घेत आहोत…
समाजबांधवच नव्हे तर इतर बांधवांना देखिल आमची समिती वेळोवेळी मदत करत आहे… संपूर्ण रूम वेळोवेळी सॅनिटाइज करणे, मास्क वापरणे, तापमान मोजणे या सर्व बाबींची आमच्याकडे दखल घेतली जाते.
सामाजिक बांधिलकीतून केलेली ही फक्त मदत आहे. कोणत्याही बाधित व्यक्तींना आम्ही येथे आश्रय दिलेला नाही. शेवटी आम्हालाही प्रत्येकाच्या जिवाची काळजी आहेच. कृपया यात आम्ही अजून कशी काळजी घेतली पाहिजे. याबाबत आपल्या काही सूचना असल्यास त्या आम्हास नक्की सांगाव्या, ही मनापासून विनंती.
आपलीच
– कोविड सहाय्यता समिती, माहेरघर मंगल कार्यालय, नाशिक