भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप
मुंबई ः कोरोना काळातही सरकार भ्रष्टाचार करत आहे. प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भ्रष्टाचाराची ही सगळी प्रकरणे आपल्याला उडकीस आणायची आहेत, असे आवाहनही त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना केले.
भाजपच्या नवनियुक्त पदाधिकऱ्यांसोबत आज पहिली ऑनलाईन बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले की, आपण शेतकऱ्यांना जाहीर केलेली फसवी कर्ज घोषणे विरोधात आंदोलन उभे केले. या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम आज दिसून येत आहे. कोरोना संकटामुळे आपले सर्वच अॅक्टिव्हीटी वर मर्यादा आल्या. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या संकट काळात कोणी गरजू उपाशी राहणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी ५२ लाख लोकांपर्यत जेवण पोहोचविण्याचे टार्गेट दिले. सुरुवातीला हे कठीण वाटले मात्र नड्डाजीनी दिव्य शक्तीची जाणीव करून देत मार्गदर्शन केले. यामुळे आज आपल्याकडून २ कोटी ८८ लाख लोकांना फूड पॅकेट आणि ४२ लाख लोकांना रेशन पुरविले. दुसऱ्या टर्मच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाचे टार्गेटही आपण पूर्ण केले. या कार्यक्रमाला २ कोटी १६ लाख लोक सहभागी झाले होते. कोरोना संकट काळातही आपण लोकांच्या समस्या प्रभावीरीत्या सरकार पुढे मांडल्या. ऑनलाईन पद्धतीने मेरा आंगन मेरा रणांगण हे यशस्वी आंदोलन केल्याचे ते म्हणाले.
पाटील यांनी सांगितले की, दूध आंदोलन उभे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. यापुढे आपल्याला ३ टप्प्यात काम करायचे आहे. कोरोना रुग्णाची सेवा, स्क्रिनिंग, विलगीकरन लोकांना मदत करणे. या सगळया सोबत राजकीय लढाई सुद्धा लढायची आहे. सरकार येणे न येणे याची आपण काळजी करू नये. मात्र आपल्या नेत्यावर कोणतेही स्टेटमेंट खपवून घेऊ नये. आक्रमक रीत्या त्याला उत्तर द्यावे. शांत बसणे म्हणजे मान्य करणे असे होते म्हणून आपण उत्तर दिलं पाहिजे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.