नाशिक – कोरोना परिस्थितीत हलगर्जी दाखविल्या प्रकरणी राज्यातील पहिला गुन्हा नाशिकमध्ये एका क्लास वन अधिकाऱ्यावर दाखल झाला आहे. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली असून यापुढील काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून गांभीर्याने कोरोनाची जबाबदारी सांभाळली जाण्याची चिन्हे आहेत.
कोरोनाची परिस्थिती हाताळताना हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांच्या विरोधात पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत क्षेत्रिय स्तरावरील समन्वयासाठी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी समन्वय साधण्यात दुर्लक्ष केल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी गुन्हा दाखल केला आहे. राजपत्रित वर्ग एक अधिका-याच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.