बर्लिन – युरोपीयन देशात कोरोनाचा कहर वाढतच असल्यामुळे ब्रिटन पाठोपाठ आता जर्मनीनेही देशभरात पुन्हा कडक लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा चान्सेलर अंजेला मर्केल यांनी केली आहे.
मर्केल यांनी याबाबत निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, या महिन्याच्या अखेरी पर्यंत (म्हणजे ३१ जानेवारी) देशव्यापी लॉकडाउन वाढवत आहोत. कोरोनो विषाणू संक्रमणास आळा घालण्यासाठी कठोर व नवीन निर्बंध लादणे अगत्याचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एका दिवसात हजार बळी
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जर्मनीत पहिल्यांदाच ३० डिसेंबर रोजी एका दिवसात तब्बल १ हजार जणांचा कोरोना बळी गेला आहे. तर रॉबर्ट कोच संस्थेच्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने केलेल्या नोंदीनुसार, गेल्या बुधवारी ११२९ मृत्यू झाले आहेत. ही परिस्थिती पाहूनच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
अशी आहे जर्मनीतील स्थिती
दररोज शेकडो मृत्यू
जर्मनीत दिवसाकाठी सरासरी ९०० मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. तर जर्मनीतील कोरोना मृतांची एकूण संख्या ३२ हजार १०७ वर पोहोचली आहे. जर्मनीतील या साथीच्या पहिल्या लाटेत (टप्प्यामध्ये) मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी होते, परंतु दुसर्या लाटेत अलीकडील आठवड्यांमध्ये दररोज शेकडो मृत्यू होत आहेत. प्रमुख युरोपियन देशांपैकी इटली, ब्रिटन, फ्रान्स आणि स्पेनमध्ये अजूनही जास्त मृत्यू आहेत.
सर्व व्यवहार बंद
१६ डिसेंबर रोजी जर्मनीमध्ये शाळा आणि बहुतेक दुकाने बंद झाल्याने ही बंदी १० जानेवारीपर्यंत अस्तित्त्वात राहील. आता या निर्बंधांना ३१ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जर्मनीत आतापर्यंत १६ लाख ९ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
ब्रिटनमध्येही कडक लॉकडाउन
ब्रिटनमध्ये एका दिवसातच सर्वाधिक म्हणजे तब्बल ६० हजार १९६ जणांना कोरोनाची लागण झाली. ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या संसर्गाचा नवीन प्रकार वेगाने पसरल्यामुळे पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.