केपटाऊन – युरोप नंतर आता दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे आरोग्य परिस्थिती अतिशय बिकट होत आहे. रोज मृतांची संख्या वाढत असल्याने शवपेटींचा तुटवडा जाणवत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये १२० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर या देशातील नागरिक नवीन आव्हानांचा सामना करीत आहेत. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी ४२२ जणांचा मृत्यू झाला तर १५ हजारापेक्षा जास्त जण संक्रमित झाले. सरकार परदेशातून लवकरच लस आणणार असून देशभरातील लोकांना एक डोस दिला जाईल. शवपेट्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असतानाही दफनभूमीतही जागा कमी पडत आहे. मोठ्या संख्येने मृत्यू झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या विषाणूबद्दल आम्हाला काळजी वाटत आहे. दक्षिण आफ्रिकेतील डेलमासमधील अंत्यसंस्कार केद्राचे संचालक थाबिसो मौमाको म्हणाले की, कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढत असून येथील कर्मचार्यांना याची अत्यंत भीती आहे.