नवी दिल्ली – देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये ८२ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आढळले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, शनिवारी ( ६ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजेपर्यंत देशभरात १८,३२७ नवे रुग्ण आढळले आहेत. एक दिवसातील ही संख्या गेल्या ३६ दिवसांनंतर सर्वाधिक मानली जात आहे. यादरम्यान १०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ कोटी ११ लाख ९२ हजार ८८ इतकी झाली आहे. या महामारीत आतापर्यंत १ लाख ५७ हजार ६५६ लोकांचा जीव गेला आहे.
देशातील सक्रिय रुग्णसंख्येत वाढ
भारतात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढून एक लाख ८० हजार ३०४ इतकी झाली आहे. उपचार सुरू असलेली एकूण रुग्णांची संख्या संसर्ग झालेल्या संख्येच्या १.६१ टक्के आहे.
२१ राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या १००० हून कमी
देशाकील २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराहून कमी आहे. अरुणाचल प्रदेशात फक्त तीन कोरोनारुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. २४ तासात केरळ, छत्तीसगड, तामिळनाडूमध्ये सक्रिय रुग्ण वाढले आहेत. परंतु महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये सक्रिय रुग्णसंख्या वाढली आहे.
सहा राज्यात ८५ टक्क्यांहून अधिक मृत्यू
कोरोनामुळे होणारे ८५.२ टक्के मृत्यू फक्त सहा राज्यांमध्ये होत आहेत. एकूण १०८ पैकी ५३ मृत्यू महाराष्ट्रात, १६ केरळमध्ये, ११ पंजाबमध्ये झाले आहेत.
यूपीसह १८ राज्यात एकही मृत्यू नाही
देशातील १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. त्यामध्ये गुजरात, प. बंगाल, उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, आसाम, सिक्कीम, मणिपूर, लडाख, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मिझोरम, अंदमान आणि निकोबार, दमन, दीव तसेच दादरा नगर हवेलीमध्ये गेल्या २४ तासात एकही मृत्यू झालेला नाही.
२२ कोटी नमुन्यांची तपासणी
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) नुसार, देशात आतापर्यंत २२ कोटी ६ लाख ९२ हजार ६७७ कोविड नमुन्यांची तपासणी झाली आहे. त्यामध्ये ७ लाख ५१ हजार ९३५ नमुन्यांची शुक्रवारी तपासणी करण्यात आली आहे.