नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाला आपल्या कवेत घेतले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिल्ली, महाराष्ट्रासह अनेक राज्यात लॉकाडाउन, रात्रीची संचारबंदी, वीकेंड लॉकडाउन अशा कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. दुसऱ्या लाटेमुळे आतापर्यंतचे सगळे विक्रम मोडले आहेत.
ताज्या आकडेवारीनुसार, देशात एका दिवसात कोरोनाचे १,१५,२३९ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोना प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत आढळणाऱ्या रुग्णांमध्ये ही सर्वाधिक संख्या आहे. रविवारनंतर दुसर्यांना एक लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात परिस्थिती खूपच गंभीर झाली असून रात्रीची संचारबंदी आणि वीकेंड लॉकडाउन लावण्यात आला आहे. त्याशिवाय दिल्लीतसुद्धा रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इतर राज्यातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाउन लावावा लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्राती परिस्थिती जातेय हाताबाहेर
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या बेकाबू झाली आहेत. राज्यात दररोज ५० हजारांच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. देशाच्या ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळत आहेत. राज्य सरकारने वीकेंड लॉकडाउन आणि रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे. राज्य सरकार सध्या पूर्ण लॉकाडाउन लावू इच्छित नाही. परंतु रुग्णसंख्या हाताबाहेर गेल्यास लॉकडाउन लावण्याशिवाय राज्य सरकारकडे कोणताच पर्याय राहणार नाही. बुधवारी महाराष्ट्रात तब्बल ५९,९०७ रुग्ण आढळले आहेत. ३०,२९६ रुग्ण बरे झाले असून, ३२२ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आतापर्यंत ३१,७३,२६१ रुग्ण आढळले आहेत. तसेच ५,०१,५५९ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ५६,६५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यूपीत अनेक शहरात रात्रीची संचारबंदी
लखनऊ महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ८ एप्रिल रात्री ९ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत रोज रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. सद्यपरिस्थितीत १६ एप्रिलपर्यंत सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी सुरू असेल. त्याशिवाय प्रयागराज, कानपूर, बनारस आणि नोएडामध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
दिल्लीसुद्धा रात्रीची संचारबंदी
नवी दिल्लीमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे मंगळवारी दिल्ली सरकारने रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री दहा वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत निर्बंध लागू असतील. अत्यावश्यक सेवेतील लोकांना या निर्बंधातून सूट दिली आहे. लॉकाडाउन लावण्याचा विचार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. लग्नसोहळे, अंत्ययात्रा, श्राद्ध अशा कार्यक्रमांवर आधीच निर्बंध लावण्यात आलेले आहेत.
पंजाबमध्ये ३० एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण पंजाबमध्ये रात्री ९ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. यापूर्वी १२ जिल्ह्यांमध्ये १० एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली होती. आता पूर्ण राज्यात लागून करून त्याचा अवधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. राजकीय पक्षांच्या सभा आणि कार्यक्रमांवर बंधने घालण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात महामारी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मध्य प्रदेशात कठोर उपाययोजना
कोरोनाच्या दुसर्या लाटेत मध्य प्रदेशतमध्ये कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. शाजापूरमध्ये ७ एप्रिलला रात्री ८ वाजेपासून १० एप्रिलला सकाळी ६ वाजेपर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच भोपाळ, इंदूर आणि जबलपूरसह १३ शहरांमध्ये वीकेंड लॉकाडाउन लावण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबतचा निर्णय आपतकालीन व्यवस्थापन समितीवर सोडला आहे. सध्या भोपाळ, इंदूर, जबलपूर, ग्वाल्हेर, उज्जैन, विदिशा, छिंदवाडा, नरसिंहपूर, बडवानी, बैतूल, खरगोन, मुरैना आणि रतलामला रविवारी लॉकाडाउन लावण्यात येणार आहे.
गुजरातमध्ये २० शहरात आजपासून रात्रीची संचारबंदी
गुजरात उच्च न्यायालयाने लॉकडाउन किंवा रात्रीची संचारबंदी लावण्याचा सल्ला दिल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुजरात सरकारने २० शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. सोबतच लग्नसोहळ्यात १०० लोकांचीच परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिली. ७ एप्रिलपासून २० शहरांमध्ये रात्री ८ पासून सकाळी ६ पर्यंत संचारबंदी सुरू राहील. ३० एप्रिलपर्यंत मोठे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. सरकारी कार्यालये ३० एप्रिलपर्यंत शनिवारी बंद राहतील.
झारखंडमध्ये अंशतः लॉकडाउन
कोरोना संसर्गाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर सोरेन यांनी ही घोषणा केली आहे. त्या अंतर्गत पुढील सूचनेपर्यंत राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, जिम, चित्रपटगृहे, पार्क आणि सार्वजनिक संस्था बंद राहतील. या निर्णयासोबतच राज्यात अंशतः लॉकडाउन लावण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
छत्तीसगडमध्ये कोरोनाचा स्फोट
छत्तीसगडमध्ये कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे केंद्रासह राज्य सरकारची चिंता वाढली आहे. केंद्राने कोरोनाबाधित जिल्ह्यांमध्ये उच्चस्तरीय पथके पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. छत्तीसगडमध्ये सोमवारी ७ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील दुर्ग, राजनांदगाव आदी भागात लॉकडाउन लावले आहे. रायपूरमध्ये दहा दिवसांचा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. रायपूर जिल्हात ९ एप्रिलला सायंकाळी ६ ते १९ एप्रिलपर्यंत सकाळी ६ वाजेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे.