नवी दिल्ली – देशात कोरोना महामारी अतिवेगाने फैलावत असून त्याची तीव्रता वाढत चालली आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यानुसार पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी लोकांचे सहकार्य गरजेचे असण्यावर भर देण्यात आला आहे.
देशात वाढत्या प्रादुर्भावामुळे महामारीची परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. परंतु प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो, असे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पाल यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोना नियमांचे पालन करणे, प्रतिबंधित क्षेत्रांची ओळख पटवणे, चाचण्या करणे आदींना प्रभावीपणे लागू करणे आवश्यक आहे. आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा आणि लसीकरण अभियान वेगाने चालवण्याची गरज असल्याचे डॉ. पाल म्हणाले.
महामारीची तीव्रता वाढली असून, गेल्या वर्षीपेक्षा अधिक वेगाने प्रादुर्भाव वाढत आहे. काही राज्यांमध्ये परिस्थिती इतरांच्या तुलनेत नियंत्रणाबाहेर जात आहे. परंतु कोरोनारुग्णांची संख्या देशभरात वाढत आहे. दुसर्या लाटेला नियंत्रणात आणण्यासाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे. आगामी चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे असून, संपूर्ण देशाला एकत्रितरित्या महामारीविरोधात लढा उभारावा लागणार आहे, असेही डॉ. पाल म्हणाले.
केंद्रीय पथके तैनात
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्याचा सक्रिय रुग्णसंख्येत सर्वाधिक रुग्ण असलेल्या दहा जिल्ह्यात समावेश आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या सात जिल्ह्यांचा समावेश आहे. कर्नाटकमधील बंगरुळू शहर आणि दिल्लीतही सक्रिय रुग्ण आहेत. केंद्र सरकारने ५० उच्चस्तरीय आरोग्य पथके स्थापन केले असून, महाराष्ट्रात ३०, छत्तीसगडमध्ये ११ आणि पंजाबमध्ये ९ पथके पाठविण्यात आली आहेत. या राज्यांमधील सर्वात अधिक रुग्ण आढळत आणि मृत्यू होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आलेली आहेत.
लसीकरण यांचेच
देशातील ज्या लोकांना लसीकरणाची गरज आहे, त्यांनाच लस देण्यात येणार आहे. ४५ वयोगटाखालील तरुणांना लसीकरण करण्याच्या प्रश्नावर राजेश भूषण यांनी सांगितले. महामारीमुळे होणारे मृत्यू रोखणे ही सरकारची प्राथमिकता आहे. ४५ वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण करणारा भारत जगातील एकमेव देश आहे.
वेगाने लसीकरण
देशातील लसीकरण जगात सर्वाधिक वेगाने होत आहे. फक्त अमेरिकेतच भारतापेक्षा अधिक लस देण्यात येत आहे. परंतु अमेरिकेत भारताआधीच लसीकरणाला सुरुवात झाली होती. अमेरिकेत प्रतिदिन सरासरी ३०.५३ लाख लोकांचे लसीकरण होत आहे. तर भारतात प्रतिदिन २६.५३ लाख लोकांचे लसीकरण होत आहे. एकूण लशीचे डोस देण्याबाबत अमेरिकेनंतर भारत दुसर्या स्थानावर आहे. अमेरिकेत १६ कोटी ५० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. तर भारतात ८ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. ४५ वर्षांहून अधिक लोकांचे लसीकरण झाल्यानंतर त्यापेक्षा कमी वय असलेल्या लोकांचे लसीकरण सुरू करण्यात येईल, असे डॉ. पाल यांनी सांगितले.