नाशिक – शहरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी अखेर शहर पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळेच शहराच्या सर्व भागात पोलिसांनी रविवारी रात्री सात वाजेच्या सुमारास मोठ्या फौजफाट्यासह दौरा केला. तसेच, दंडात्मक कारवाई केली.
पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांचे आदेशानुसार परिमंडळ-१ मध्ये पोलीस उपायुक्त अमोल तांबे, संजय बारकुंड आणि विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे व विशेष शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साध्या गणवेशात कारवाई केली. पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रिंगी यांचे अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांनी नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी पेट्रोलिंग केले. होळी सणानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासनाचे निर्बंध पाळले जातील याबाबत पूर्णतः दक्षता घेण्यात आली. ज्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन होईल अशा इसमांवर कारवाई करण्यात आली.
महापालिका आणि पोलीस प्रशासन यांनी रविवारी संयुक्त कारवाई केली. नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सहपोलिस आयुक्त शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेगवेगळ्या टीम करून स्टेशन परिसर व जेलरोड परिसरात पाहणी करण्यात आली. त्यामध्ये पी ए सिस्टीम द्वारे लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यात आली. सोशल डिस्टंसिंगसाठी दुकानासमोर चौकोन/गोल आखण्याचे सांगण्यात आले.










