नाशिक – कोरोनाचा संसर्ग लक्षणीयरित्या वाढतो आहे. त्याला अटकाव घालणे आवश्यक आहे. यापूर्वीच योग्य ते निर्बंध लावले आहेत. त्याचे कसोशीने पालन करणे आवश्यक आहे. ते करुनही काही झाले नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच राहिला तर लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही. असा गंभीर इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
पालकमंत्री भुजबळ यांनी कोरोनावर मात केल्यानंतर प्रथमच नाशिकमध्ये आगमन केले. नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होतो आहे की काय, अशी स्थिती आहे. सद्यस्थितीत उपचार घेणाऱ्या कोरोना बाधितांचा आकडा दहा हजारांच्या पुढे गेला आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या लक्षणीयरित्या वाढते आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे कसोशीने पालन करावे. प्रशासनाने त्यावर कडक लक्ष ठेवावे. जे दुकानदार निर्बंधांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. ज्या व्यक्ती मास्क घालत नाहीत त्यांना दंड करतानाच थेट पोलिस स्टेशनची वारीही घडवावी, असे भुजबळ यांनी बैठकीत बजावले.
मास्क नसलेल्यांना सेवा देणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी. जी कार्यालये आणि दुकाने कोरोना नियमांचे उल्लंघन करतात त्यांना थेट सील करावे, असे स्पष्ट निर्देश भुजबळ यांनी दिले आहेत.
बैठकीला कृषीमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त, कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, महापौर सतीश कुलकर्णी, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.