नाशिक – शहरातील कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव वाढत असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या, शहरात सद्यस्थितीत वाढलेला रुग्णांचा मृत्युदर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची समस्या, अपुरे मनुष्यबळ, कोविड रुग्णावर उपचारासाठी आवश्यक रेमेडेसिव्हर व ॲक्टेमरा इंजेक्शनचा पडलेला तुटवडा आदी विषयासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नाशिक यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले आहे. शहरातील कोरोनाच्या वाढत्या परिवस्थितीवर काहीतरी ‘स्मार्ट प्लॅन’ लवकरात लवकर आणावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. संबंधित विषयावर तत्काळ कारवाहीचे आदेश देणार असल्याचे आश्वासन भुजबळ यांनी दिल्याचे मनसेच्या शिष्टमंडळाने सांगितले आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, जिल्हाउपाध्यक्ष सुरेश घुगे, मनविसे जिल्हाध्यक्ष शाम गोहाड आदी मान्यवर उपस्थित होते.