नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणं आणि बाजारपेठांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये मास्क न वापरणाऱ्या लोकांना दंडाची तरतूद असून खरेदीसाठीच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.
या नव्या सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्रातील बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत. एखाद्या भागात अचानक कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यास तिथले बाजारही बंद करण्यात येणार आहेत. किराणा माल ऑनलाईन मागवणं आणि त्याचं घरोघरी जाऊन वितरण करणं या बाबींना चालना देण्यात येणार प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये राहणारे दुकानदार आणि दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी यांना बाजारपेठांमध्ये जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
नव्या मार्गदर्शक सूचनांचं पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी संबंधित ठिकाणच्या व्यापारी संघटनांनी घ्यावी, त्यानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात, असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. सरकारनं मान्य केलेल्या किमतींना मास्कची विक्री करणारी यंत्रणा प्रत्येक बाजाराच्या प्रवेश द्वारापाशी आणि वाहनांच्या पार्किंगच्या जागेजवळ उभारावेत, असंही यामध्ये सुचविण्यात आलं आहे.