नाशिक – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. गेल्या महिन्यात ते कोरोना बाधित झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे, भुजबळ हे अन्य आजारांशीही सामना करीत आहेत. अशातच त्यांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडाही दहा हजारांच्या जवळ येऊन ठेपला आहे. याची दखल भुजबळ यांनी घेतली आहे. त्यामुळे कोरोनावर मात करुन नाशिकला प्रथमच येऊन ते कोरोनाची आढावा बैठक घेणार आहे. पालकमंत्री भुजबळ हे गुरुवारी (१८ मार्च) सकाळी नाशिकला येणार आहेत. सकाळी ११.३० वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना सद्यस्थिती व आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्तांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.