नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधक लस उपलब्ध होईपर्यंत दिल्लीतील शाळा बंदच राहणार आहेत. तशी माहिती उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे.
देशभरातील शैक्षणिक संस्था सध्या कोविड -१९ या आजारामुळे मार्चपासून बंदच आहेत. सर्व राज्यात याबाबत काळजी घेण्यात येत आहे, मात्र काही राज्यामध्ये दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, दिल्ली महानगरात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सिसोदिया म्हणाले की, जोपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत दिल्लीतील शाळा उघडण्याची शक्यता नाही.
सिसोदिया यांनी मागील महिन्यात जाहीर केले होते की साथीच्या आजाराने निर्माण झालेल्या असुरक्षित वातावरणामुळे दिल्लीतील बहुतेक पालक व शिक्षक शाळा पुन्हा सुरू करण्यास उत्सुक नाहीत आणि म्हणूनच पुढील सूचना येईपर्यंत शाळा बंद राहतील.
दरम्यान, काही राज्ये आता टप्प्याटप्प्याने शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत विचार करून निर्णय घेऊ शकतात. तसेच अनलॉकच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनेक राज्यांनी शाळा पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली. तर काही राज्यांनी कोरोनाच्या फैलावामध्ये वाढ झाल्यामुळे पुन्हा शाळा बंदची घोषणा केली. यापूर्वी दि. २१ सप्टेंबरपासून शाळांना इयता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलण्याची परवानगी देण्यात आली होती. तथापि, दिल्ली सरकारने आता त्याविरोधात निर्णय घेतला आहे.