नवी दिल्ली – कोरोनामुळे महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये कडाऊन किंवा कठोर निर्बंध तरी लादण्यात आले आहेतच. त्यामुळे अनेक महिन्यांनी उघडलेली शाळा–महाविद्यालये पुन्हा एकदा बंद करावी लागली. गुजरात, पंजाब आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये शाळा–महाविद्यालयांना पु्न्हा कुलूप लावावे लागले. पंजाब शिक्षण मंडळाने एक महिन्यासाठी परीक्षा पुढे ढकलल्या. तर काही राज्यांमध्ये अद्याप निर्णय झालेला नाही.
महाराष्ट्रात दिले हे आदेश…
महाराष्ट्र सध्या दुसऱ्या लाटेत आघाडीवर आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात वाढत आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत नाट्यगृह, सभागृह ५० टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यातही मास्कशिवाय परवानगी नसेल. सर्व खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतांसह सुरू आहेत.
पुणे, नाशिकमध्ये शाळा–महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तर विदर्भात अकोला, अमरावती आणि नागपूरमध्ये लॉकडाऊनची वेळ आली. नागपुरात तर १५ ते २१ मार्च या कालावधीत कडक लॉकडाऊनची घोषणाच करण्यात आली. त्यामुळे शाळा, कॉलेजसह सर्व खासगी कार्यालयेही बंद आहेत. शिवाय औषधांची दुकाने वगळता जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही केवळ दुपारी १ पर्यंतच खुली राहतात.
पालघरमध्ये शाळा–महाविद्यालये बंद
महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात सर्व सरकारी शाळा, कॉलेज, हॉस्टेल आणि खासगी शाळा पुढील आदेशांपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. नंदोर येथे एका निवासी शाळेत (आश्रम शाळा) शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ३० लोकांना कोरोना झाल्यामुळे हे वसतीगृहच सील करण्यात आले आहे. मुंबईत सर्व शिक्षकांना आनलाईन शिकविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गुजरात, पंजाब, मध्यप्रदेशात वाईट स्थिती
गुजरातच्या अहमदाबाद, सूरत, राजकोट, बडोद्दा, जामनगर, भावनगर, गांधीनगरसह आठ महानगरपालिकांमध्ये १० एप्रिलपर्यंत शाळा–कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तर काही प्रमुख शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. भोपाळ येथील मध्य प्रदेश प्रोफेशनल एग्झामिनेशन बोर्डाने पोलिस भर्तीसाठी होणारी परीक्षा स्थगित केली आहे. तसेच महाराष्ट्र व मध्यप्रदेश दरम्यान आंतरराज्य बस सेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
पंजाबमध्ये ३१ मार्चपर्यंत ११ जिल्ह्यांमध्ये मेडीकल कॉलेज वगळता सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश आहेत. याशिवाय नागरिकांसाठीही कठोर निर्बंध ठेवण्यात आले आहेत. पंजाबमध्ये २२ मार्चपासून सुरू होणारी बारावीची परीक्षा आता पुढील महिन्यात २० एप्रिलला सुरू होईल.