जयपूर – कोरोना महामारीच्या काळात सर्व क्षेत्रांमध्ये मोठा बदल झाला आहे त्यास विवाह समारंभही अपवाद नाही. लग्नाचा ट्रेंड पूर्णपणे बदलला असून लग्नात येणाऱ्या पाहुण्यांच्या संख्येवर सरकारने प्रतिबंध लावले आहेत. ५०, १०० आणि २०० अशा प्रकारे उपस्थिती संदर्भात निर्बंध घालण्यात येत आहेत. त्यामुळे यावर आता नवा उपाय शोधून काढण्यात आला आहे. सर्व मंडळींना एकत्र न बोलवता वेगवेगळ्या दिवशी वेगळ्या विधीसाठी पाहुण्यांना आमंत्रित केले जात आहे. यासाठी खास त्या त्या दिवसासाठी पत्रिका छापण्यात येत आहेत. मेहंदी, संगीत अशा निरनिरळ्या कार्यक्रमाला पाहुण्यांची उपस्थिती लावावी यासाठी ही शक्कल लढवण्यात आली आहे.
लग्नाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण करणे हे आव्हानात्मक असून त्याद्वारे सर्व नातेवाईकांना उपस्थित राहता येणार आहे. जे नातेवाईक किंवा मित्रपरिवार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही, अशा सर्वांसाठी लाईव्हद्वारे प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. त्यासाठी पत्रिकेवर संबंधित लाईव्हची लिंक दिली जात आहे. तसेच सदर लिंकचा पासवर्ड हा मेसेजद्वारे दिला जात आहे.
लग्नाचे नियोजन करणारे सांगतात की, कोरोनामुळे लग्नांमध्ये येणाऱ्या पाहुण्यांची संख्या मर्यादित केली असली तरी देखील त्यावर नवीन कल्पना पुढे येत आहेत. त्यातील एक म्हणजे थेट प्रक्षेपण. ५० – ६०% जण लाईव्ह स्ट्रीमिंगची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर लग्न करणार्यांकडून फूड पॅकेट घरी पाठविण्याची मागणी होत आहे. देशाच्या विविध भागात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने लग्न समारंभामध्ये थेट प्रक्षेपण फायदेशीर ठरते आहे. थेट प्रेक्षपण, घरपोच जेवण, वेगवेगळ्या कार्यक्रमांना वेगवेगळे पाहुणे अशा विविध प्रकारच्या संकल्पनांनी विवाहकार्य आणखीनच यादगार बनविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.