मुंबई – २०२० च्या मार्च महिन्यात भारतात कोरोनाचा व्यापक प्रसार झाला. आणि त्यापासून वाचण्यासाठी कठोर उपाय म्हणून सरकारने कडक लॉकडाऊन केले. गर्दीची सर्व ठिकाणे बंद करण्यात आली. यातच चित्रपटगृहे बंद झाली. शिवाय कोरोनाची लागण होऊ नये म्हणून कोणालाही एकत्र येण्यास बंदी असल्याने जवळपास २ ते ३ महिने मालिकांचे शूटिंगही बंद होते. पण या सगळ्या परिस्थितीमुळे मनोरंजन क्षेत्राला मात्र मोठा आर्थिक फटका बसला आहे.
एएनआयच्या रिपोर्टनुसार, दरवर्षी बॉक्स ऑफिसवर जवळपास ३ हजार कोटींची उलाढाल होते. पण, २०२० मध्ये हीच रक्कम ५०० ते ६०० कोटींवर आली आहे. म्हणजेच चित्रपट उद्योगाला २५०० कोटींचा मोठाच फटका बसला आहे. सिंगल स्क्रीन थिएटरना महिन्याला २५ ते ७५ लाखांचे नुकसान झाले आहे. यात चित्रपटांसाठी होणारी गुंतवणुकीवरील व्याज आणि दुसऱ्या खर्चांचा विचार केला तर हे नुकसान फारच वाढेल.
भारतात दरवर्षी जवळपास २ हजार चित्रपट तयार होतात. यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो. यात कलाकार, कॅमेरामन, मेकअप आर्टिस्ट, डिझायनर, ज्युनिअर कलाकार, स्पॉटबॉय, आदींचा समावेश असतो. पण गेल्या वर्षी चित्रपटांची निर्मितीच न झाल्याने हे सगळेजण बेकार झाले. चित्रपट तयार झाले की, ते चित्रपटगृहात रिलीज केले जातात. मल्टिप्लेक्स असोसिएशननुसार, देशभरातील चित्रपटगृहांमध्ये जवळपास २ लाख लोक छोटी मोठी कामे करतात. पण थिएटर बंद झाल्याने त्यांच्यावरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली.
निवडला ओटीटीचा पर्याय
कोरोनाचे संकट आले नसते तर असे अनेक चित्रपट रिलीज झाले असते ज्यांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली असती. यात दोन प्रकारचे चित्रपट असतात, प्रदर्शनासाठी तयार असलेले चित्रपट ज्यांची रिलीज डेट निश्चित असते आणि दुसरे असे चित्रपट ज्यांचे थोडे शूटिंग बाकी असते किंवा पॅचवर्क शिल्लक आहे. पण या सर्वच चित्रपटांनी नुकसान टाळण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. या काळात अनेक चित्रपट अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स आणि डिस्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाले.