पंढरपूर ः देशभरात कोरोना लसीकरण वेगानं सुरू असले तरी कोरोनाचं संकट कमी होताना दिसत नाही. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. संसर्गामुळे यंदा पंढरपूरमधली माघी यात्रा भाविकांविना साजरी केली जाणार आहे. पंढरपूर शहर व परिसरातल्या दहा गावांत २२ फेब्रुवारी रात्री १२ पासून २३ फेब्रुवारी रात्री १२ पर्यंत अशी २४ तासांची संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
कोरोनामुळे या काळात कोणत्याही भाविकाला अथवा दिंडीला पंढरपूरमध्ये प्रवेश मिळणार नाही. यात्रेपूर्वी आलेल्या सर्व भाविकांना परत जावे लागणार असून, सर्व १२०० मठ व धर्मशाळेत आलेल्या भाविकांना परत पाठवण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाकडे देण्यात आली आहे. मंदिर प्रशासनानं यापूर्वीच २२ आणि २३ फेब्रुवारीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात देवाचे सर्व नित्योपचार व एकादशीची महापूजा कोरोना नियम पाळून करावेत, असे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. या काळात उपस्थित राहणा-यांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यात्रेदरम्यान वाहतूक व्यवस्था सुरू असली तरी एकाही भाविकाला पंढरपूरला उतरता येणार नाही. माघी यात्राकाळात वासकर महाराज यांच्या भजनाला फक्त ६ लोकांना कोरोनाचे नियम पाळून परवानगी देण्यात आली आहे. औसेकर महाराज यांच्या चाकरी भजनाला १२ लोकांना परवानगी दिली आहे. पुंडलिक रायच्या काल्याला २६ वारक-यांना परवानगी दिली आहे.
गेल्या वर्षी चैत्री, आषाढी आणि त्यानंतर ३ वर्षांतून येणारा अधिक मास आणि कार्तिकी यात्रा हे सर्व सोहळे कोरोनामुळे रद्द झाले होते. वारकरी संप्रदायाची येणारी पहिली यात्रासुद्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला आहे.