त्र्यंबकेश्वर – धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा …! या व अशा अनेक अभंग भजन कीर्तनाने गेल्या वर्षी संपूर्ण त्र्यंबकनगरी दुमदुमली होती. जिकडे बघावे तिकडे भगव्या पताका हातात टाळ मृदंग पखवाज डोईवर तुळशी वृंदावन घेऊन जाणा-या महिला दिंड्यात शोभुन दिसत होत्या. नवमी दशमी एकादशी पर्यंत पाचशे ते सहाशे दिंड्या त्र्यंबकेश्वर नगरीत आल्या होत्या. लाखो भाविकांनी त्र्यंबक नगरी गजबजली होती. संपूर्ण पंच क्रोशीत यात्रेचा माहोल दिसत होता. तमाशे, किर्तनाचे फड व जिकडे तिकडे हरिनामाचा महिमा ऐकू येत होता. पण, यावर्षी कोरोनाचा प्रादूर्भावामुळे यात्रा रद्द झाली. त्यामुळे त्र्यंबकेश्वरनगरी गेल्या वर्षासारखा जल्लोष दिसला नाही.
संत निवृत्तीनाथ मंदीर परिसरात आजपासून संचारबंदी लागु केली. गेल्या १५ दिवसांपासून १५ ते शंभर वारक-यां पर्यंतच्या दिंड्या जथ्या जथ्या येत असून संत निवृत्तीरायाची संजीवन समाधी भगवान त्र्यंबकेश्वर, ब्रम्हगिरी, गंगाद्वार व कुशावर्तात पुण्य स्नान करुन प्रदक्षिणा करुन परतीच्या बसने आपल्या गावी जात आहेत. येथे कोणी थांबत नाही. असे हजारो वारकरी भाविक त्र्यंबक नगरीत येऊन गेले. आजही अशा शेकडो वारकरी भाविकांनी त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमत आहे. फरक इतकाच की दरवर्षी लाऊडस्पीकर असतात. सगळीकडे एकच जल्लोष एकाच वेळी किर्तन भारुड भजन तमाशातील चित्रपटांची गाणे तर कुठे लावण्या असा एकच गोंगाट ऐकु येतो. तो यावेळी नाही.
गेल्या एकादशीला पालक मंत्र्यांना निमंत्रण दिले होते. पण पहाटे तीन वाजेच्या पुजेला ते येऊ शकत नसल्याने ते सकाळी ६ वाजता येणार म्हणून पहाटेची पूजा अगोदर निवृत्तीनाथ समाधी संस्थान पदाधिकारी यांनी केल्यावर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सपत्नीक केली होती. तर सकाळी सहा वाजता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना.छगन भुजबळ यांनी सपत्नीक पुजा केली होती. दरम्यान यावर्षी ना.भुजबळ यांना निमंत्रण दिले असले तरी कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर ते येणार नाहीत. यामुळे पुनश्च नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व उपनगराध्यक्ष सागर उजे सपत्नीक संजीवन समाधीची महापुजा करतील. तर तत्पुर्वी समाधी संस्थानच्या प्रशासकीय समितीच्या सदस्यांच्या सहायक धर्मदाय आयुक्त के एम सोनवणे, अॅड.भाऊसाहेब गंभीरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, मुख्याधिकारी संजय जाधव आदींच्या उपस्थितीत तसेच मोजक्याच वारक-यांच्या उपस्थितीत प्रथम मान वारकरी बांधवांच्या हस्ते महापुजा केली जाईल. असा प्रशासकीय समितीचा निर्णय आहे. महापूजा वारक-यांच्याच हस्ते व्हावयास हवी.
गेल्या तीन चार वर्षापासून थेट जिल्हा प्रशासनाने निर्मळ वारी हा उपक्रम राबविण्यास त्र्यंबक नगरपरिषदेला सक्त आदेश दिले होते. त्यानुसार शहरात निर्मळ वारी राबविण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था शहराचे नागरिक नाशिकचे डाॅ. भरत केळकर आणि त्यांची टीम आदी निर्मळवारी हा उपक्रम अधिक व्यापकपणे रावितात. यंदा हा उपक्रम राबवणे शक्यच नाही.यात्रा प्रदुषण मुक्त व पर्यावरण पुरक पार पडावी हा मुळ उद्देश प्रशासनाचा असतो. मात्र या वर्षी यात्रेला गर्दीच होणार नसल्याने ना निर्मळ वारीना पर्यावरण पुरक यात्रा पार पडण्याचा काहीच प्रश्न राहणार नाही. तसे पाहता यात्रेत कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असते. यामध्ये एरवी शांतपणे जीवन जगणारे त्र्यंबककर यात्रा कालावधीत काहीना काही टेंपररी चहाचे हाॅटेल प्रसादी, वाण, सामान, खेळणी आदीसह केळी खजुर व फराळाचे पदार्थ विक्रीसाठी ठेवतात. पण या वर्षी अशी कोणत्याही व्यावसायिकांनी दुकाने लावली नाहीत. त्यामुळे दरवर्षी होणारी कोट्यवधींची उलाढाही यावर्षी नाही.
दरम्यान संत निवृत्तीनाथ मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांना प्रवेश करता येऊ नये म्हणुन बंद करण्यात आले आहेत. मात्र त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश सुरू राहणार आहे.
- संत निवृत्ती नाथ महाराज मंदिरात नित्य नैमित्तिक पुजा व यात्रा महापूजा होणार असून यात्रेची परंपरा पाळली जाणार आहे.- यात्रा कालावधीत संत निवृत्तीनाथ मंदिराकडे वरील तीन दिवस संचार बंदी राहणार आहे. तर नागरीकांच्या काही भागात आंशिक संचार बंदी लागू राहणार आहेत. संचार बंदी क्षेत्र या पूर्वीच जाहीर झाली आहे.
– संत निवृत्तीनाथ मंदिरा कडे जाणारे तीन रस्ते बॅरिकेट लावून बंद करण्यात आले आहेत. भाविकाना मंदिरात प्रवेश नाही. तर त्र्यंबकेश्वर मंदिरात पूर्व दरवाजाने धर्मदर्शन रांगेने भाविकाना प्रवेश राहाणार आहे
– नाशिक त्र्यंबकेश्वर रोड वर त्र्यंबकेश्वर कडे रस्त्यावर डांबर थर देणे सुरू आहे. तर संत निवृत्तीनाथ मंदिरात पहाटे ५ वाजता होणाऱ्या पूजेत वारकऱ्यांना प्रथमच मान देण्यात आला आहे. ८ ची पहाटेची महापूजा त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या वतीने होणार आहे
– संत निवृत्तीनाथ मंदिर जिर्णोद्धार काम ४१ फूट झाले असून १० फूट काम बाकी आहे सद्या धर्मदाय आयुक्त कृत प्रशासन समिती मंदिर व्यवस्थे साठी कार्यरत आहे.
- मानाच्या दिंड्याना संत निवृत्तीनाथ मंदिरात साधारण दिंडीत २० वारकरी अशी संख्या धरून प्रवेश देण्या बाबत नियोजन केले जात आहे.त्र्यंबकेश्वर बस स्थानक गजानन महाराज मंदिर समोरील जागेत जव्हारफाटा येथे हलविण्यात आले आहे.दरम्यान यात्रेकरूंच्या खाजगी वाहनांना नगरीत प्रवेश दिला जाणार नाही तर त्यांना गट नंबर १२५ येथे पार्किंग सुविधा देणेत येणार आहे
जनतेने सहकार्य करावे असे अवाहन मंदिर यंत्रणा शासन यंत्रणा यांनी केले आहे. स्थानिक नागरिकांना अत्यावश्यक कामास बाहेर पडले तर सोबत स्थानिक ओळखपत्र आधार कार्ड ठेवावे लागणार आहे.