नाशिक – जिल्ह्यात अजून कोरोनाची पहिलीच लाट संपण्याऐवजी तिच्यात चिंताजनक वाढ होत आहे. कोरोना बरा झाल्यानंतरही रुग्ण पुन्हा कोरोना बाधित होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात तात्काळ पोस्ट कोविड सेंटर महानगरपालिका क्षेत्रातील बिटको हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण भागात प्रत्येक तालुकास्तरावर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जनतेला कोरोनाची तीव्रता समजली आहे, आता कोरोनाला गांभिर्याने घेण्याची गरज आहे; नाही तर पूर्वीप्रमाणे कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय, पोलिस अधिक्षक सचिन पाटील, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, महानगरपालिकेचे नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतिश भामरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, कोरोनाबाधितांची संख्या सप्टेंबर महिन्यापर्यंत काही प्रमाणात कमी झाली होती. परंतू दसरा, दिवाळी या सणानंतर दररोज साधारण ८० ते १०० ने रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे पहिली लाट संपलेली नाही. यादरम्यान कोविड उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांमध्ये पुन्हा कोरोनीची लक्षणे दिसू लागल्याने त्यांच्यावर देखील उपचार करणे आवश्यक असल्याची बाब जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी पालकमंत्री यांचे निदर्शनास आणून दिली असता, आजारामधून बरे झालेल्या रुग्णांना देखील काही प्रमाणात वेगवेगळ्या समस्या उद्भवत असल्याने जिल्ह्यांमध्ये पोस्ट कोविड मार्गदर्शन केंद्रे सुरू होणे आवश्यक असल्याचा मुद्दा बैठकीत चर्चिला गेला. या पोस्ट कोविड सेंटरच्या माध्यमातून कोविडमधून बरे झाल्यानंतर देखील रुग्णांनी काय काळजी घेण्यात यावी, याबाबत आरोग्य यंत्रणेने नागरिकांमध्ये प्रचार व प्रसिद्धी करावी ज्यामुळे कोविडबाधित आणि कोविडमधून बरे झाल्यानंतरच्या रूग्णांमधील वाढीला वेळीच नियंत्रणात आणणे शक्य होईल, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.