नाशिक – शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. त्यामुळेच याप्रश्नी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१७ सप्टेंबर) आढावा बैठक होणार आहे. नाशिकमधील बाधितांची संख्या ५५ हजार ९४० तर कोरोना बळींची संख्या १ हजार ९१ झाली आहे. दिवसागणिक किमान १ हजार ते १५०० रुग्ण बाधित होत आहेत. त्यातच राज्य सरकारने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम सुरू केली आहे. नाशिक शहर, ग्रामीण भाग तसेच ज्या तालुक्यांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक आहे याबाबत या आढावा बैठकीत विशेषत्वाने चर्चा केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे. त्यास विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक आदी उपस्थित राहणार आहेत.