मुंबई – कोरोनाने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केले. जगभराचा विचार केला तर कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. लाखोंवर उपाशी राहण्याची वेळ आली. तर कित्येकांची आपल्या कुटुंबापासून ताटातूट झाली. सेव्हन स्टार आंतरराष्ट्रीय क्रुजवरील नोकरी गमावल्यानंतर मुंबईचा फाईव्ह स्टार शेफ चक्क रस्त्यावर बिर्याणी विकत आहे.
८ वर्षांपासून होता क्रूजवर
लॉकडाऊनमध्ये उद्योगांना मोठा फटका बसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कॉस्ट कटींग झाले. पण त्याही परिस्थितीत संयम ठेवून स्वतःला सावरत आदर्श निर्माण करणारे लोकही कमी नाहीत. त्यांच्यापासून प्रेरणा घेत लोकांनी छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय सुरू केले. मुंबईतील स्टार शेफ अक्षय पारकर हे त्यातलेच उदाहरण. अक्षयने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रुजसह कित्येक फाईव्ह स्टार व सेव्हन स्टार हॉटेल्समध्ये काम केले आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली. आठ वर्षांपासून तो एका आंतरराष्ट्रीय क्रुजवर होता.
हताश झाला नाही
नोकरी गेल्यावर अक्षय हताश झाला पण त्याने जिद्द सोडली नाही. कारण त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. कुठलेही काम लहान-मोठे नसते, याचा विचार करून अक्षयने दादरला शिवाजी मंदिरच्या पुढे एक छोटे फुड स्टॉल लावले. अक्षयच्या हाताला चव होतीच. त्यातही बिर्याणी आपण सर्वोत्तम बनवू शकतो, याचा त्याला विश्वास होता. त्याने फाईव्हस्टार दर्जाची बिर्याणी विकायला सुरुवात केली.
फेसबुकवर प्रमोशन
‘बिईंग मालवणी’ नावाच्या एका फेसबुक पेजने त्याची दखल घेतली व संपूर्ण प्रवास मांडला. बघता बघता अक्षयच्या या प्रवासाचे कौतुक करण्यासाठी हजारो लोक फेसबुकवर तुटून पडले. शिवाजी मंदिर दादर येथील बिरयानी हाऊस कमालीचे लोकप्रिय झाले.
होम डिलेव्हरीही
६५ रुपये हाफ व १४० रुपये फूल्ल प्लेट बिर्याणी लोकांच्या पसंतीस पडू लागली आहे. व्हेज बिर्याणी, अंडा बिर्याणी व चिकन बिर्याणी असे तीन प्रकार याठिकाणी मिळतात. फेसबुकवरील पोस्ट शेकडो लोकांनी शेअर केली आणि हजारो लोकांनी त्याचे कौतुक केले आहे. अक्षय पार्टी आणि लग्नाचे आर्डर्स घेतो. तसेच होम डिलीव्हरीची सोयदेखील आहे. अक्षयने अनेक तरुणांपुढे आदर्श उभा केला आहे, हे मात्र नक्की.