नाशिक – कोरोनाच्या या कठीण काळात रुग्णांना सेवा देताना देशभरात सुमारे ३८२ पेक्षा जास्त डॉक्टर मृत्यू झाला आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे दुःख न भरून येण्याइतके आहे. आतापर्यंत भारतात सुमारे २२३८ डॉक्टरांना या आजाराची लागण झाली, अशी माहिती आयएमएचे नाशिक शाखेचे नियोजित अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली.
कोरोना काळात कित्येक डॉक्टरांना आईसीयू मध्ये दाखल करून ऑक्सिजनची गरज पडली. तसेच काही जण वेंटिलेटरवर होते. या संकटांचा सामना करून ते मृत्यूच्या दाढेतून परत आले. दुर्दैवाने सर्वच डॉक्टरांना परत येणे शक्य झाले नाही. त्याचप्रमाणे परिचारिका (नर्सेस )आणि इतर आरोग्य कर्मचारी किती तरी संख्येने कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. संपूर्ण जगभरात आपल्या देशात डॉक्टरांना सर्वात जास्त प्रमाणात कोरोनाची लागण झालेली आहे.
या सर्व डॉक्टरांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेले धैर्य असाधारण आहे. या सर्वांना काही मास्क वगैरे न वापरता रस्त्यावर फिरल्यामुळे नाही झालेला हा कोरोना. तर कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य पार पाडताना झाला आहे.
मृत्यू झालेल्या डॉक्टरांनी दाखवलेले शौर्य, सेवावृत्ती, त्यांनी केलेला त्याग हे बघत वस्तुस्थितीचे भान ठेवले पाहिजे. कोरोना पॉझिटिव्ह असो किंवा नसो अशा सर्व जणांना जे सर्व डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी योग्य उपचार देण्यासाठी झटत आहेत, त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील ही जबाबदारी आहे ते ओळखावे आणि त्याप्रमाणे पावले उचलावीत अशी मागणी आयएमएच्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच सामान्य नागरिकांनी देखील हे सर्व डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी पैशासाठी नव्हे तर कर्तव्य (कर्म) म्हणून या लढाईत उतरले आहेत याची जाणीव ठेवली पाहिजे. डॉक्टरांच्या या जिगरबाज लढाईची खिल्ली उडविणारे बहाद्दरांना डॉक्टरांच्या आधी सामान्य माणसानेच सडेतोड उत्तर देऊन त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. कारण ही फक्त तुमच्या एकट्याची नव्हे; तसेच फक्त डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांची नव्हे तर ही आपल्या सगळ्यांची एकत्र लढाई आहे. आणि ती आपण सर्वांनी एकदिलाने लढायची आहे. सरकारने देखील हे आपले डॉक्टर आहेत, आणि या लढाईत जीव हातात घेऊन सर्वात पुढे लढणारे हे आमचे मुख्य शिलेदार आहेत अशा पद्धतीने डॉक्टरांना वागणूक द्यावी आणि त्यांचे मनोधैर्य वाढेल, असे बोलणे वागणे ठेवावे. सरकार आणि समाजातील सर्व नागरिक यांनी एकदिलाने खाजगी तसेच सरकारी डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांना एकदिलाने साथ दिल्यास आपण नक्कीच येत्या नजीकच्या भविष्यकाळात कोरोनारूपी प्रलयावर यशस्वीरीत्या मात करू शकतो असेही डॉ हेमंत सोननीस यांनी म्हटले आहे.